शिवसेनेची स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत


पुणे : पुण्यातील फुरसुंगी येथील स्वप्नील लोणकर या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर आज स्वप्नीलच्या कुटुंबियांची भेट घेत शिवसेना नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर स्वप्नीलच्या कुटुंबियांना शिवसेनेकडून 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एमपीएससीचा कारभार पारदर्शक असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच प्रलंबित भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु होईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता पावसाळी अधिवेशात याबाबत चर्चा झाली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत अंमलबजावणी करण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य सरकारसमोर कोरोनाच्या संकटामुळे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, राज्य सरकार संवेदनशील आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वप्नील लोणकरच्या दुर्दैवी आत्महत्येची गंभीर दखल घेऊन 15 हजार 500 पदांची तातडीने भरती करण्याचा निर्णय घेतला. गेल्याच आठवड्यात झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतचा निर्णय जाहीर केला असून याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात देखील केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.