नाविण्यपूर्ण निर्मितीसाठी 74 अब्ज रुपयांचे बक्षीस देणार फेसबुक ; मार्क झुकेरबर्ग यांची घोषणा


नवी दिल्ली : जर सोशल मीडियासाठी नवीन कन्टेन्ट निर्माण करायची काही कल्पना तुमच्याकडे असेल तर ती तुम्हाला अब्जाधीश बनवू शकते. 2022 पर्यंत असा नाविण्यपूर्ण कन्टेन्ट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर तयार करणाऱ्या यूजर्सना एक अब्ज डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात सांगायचे झाले, तर जवळपास 74 अब्ज रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. बुधवारी ही घोषणा फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी केली.

नवीन यूजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्राम या लोकप्रिय सोशल मीडियाकडे आकर्षित करण्यासाठी फेसबुकची ही योजना आहे. टीकटॉक या लोकप्रिय सोशल मीडियाप्रमाणे फेसबुक आणि इन्स्टाग्राम आता विविध कल्पना अंमलात आणणार असल्याचे हे संकेत आहेत.

ही माहिती मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून दिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, काहीतरी नाविण्यपूर्ण निर्मिती करणाऱ्या कोट्यवधी लोकांना आपण एक सोशल प्लॅटफॉर्म मिळवून देणार आहे. या नवनिर्मितीसाठी आपण एका कार्यक्रमाची आखणी करत असून त्यामध्ये 2022 पर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नाविण्यपूर्ण कन्टेन्ट देणाऱ्यांसाठी बक्षिस म्हणून एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. आमच्यासाठी अशा पद्धतीची गुंतवणूक ही काही नवीन नाही, पण येत्या काळात या योजनाची व्याप्ती वाढवण्यासाठी मी उत्सुक आहे.

मार्क झुकेरबर्ग यांनी ही योजना जगभरात लोकप्रिय सोशल माध्यम असलेल्या टीकटॉकसोबत स्पर्धा करण्यासाठी तयार केल्याचे स्पष्ट आहे. गेल्या काही वर्षांत टीकटॉकने जगभरात आपली लोकप्रियता वाढवल्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर असाच कन्टेन्ट आणण्याची तयारी मार्क झुकेरबर्ग यांनी केली आहे. यूजर्सना देण्यात येणारे हे बक्षीस फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या बोनस इनिशिएटिव्ह सीरिजच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.