महाविकास आघाडी सरकार आपल्या वजनाने कोसळेल त्यानंतर आम्ही पर्याय देऊ : देवेंद्र फडणवीस


मुंबई : आज का उद्या हे सरकार कोसळेल, असे मी कधीही सांगितले नाही. पण हे सरकार आपल्या वजनाने कोसळणार आहे. ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत पत्रकारांशी बोलताना केले आहे.

नियमित अध्यक्षांच्या अध्यक्षतेत नियम बदलण्याची ही बैठक होऊ शकते. तो अधिकार उपाध्यक्षांना नाही. पण या सरकारकडे बहुमत आहे, तर मग ही उठाठेव कशासाठी? सरकार घाबरते कशासाठी? जेव्हा यासंदर्भात विषय येईल, तेव्हा आमची भूमिका सांगू पण सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, आमदारांवर विश्वास नसल्यामुळे हातवर करून निवडणूक घेण्याचा विषय आला असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्ही सक्षम विरोधीपक्ष आहोत, हीच आमची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे. आम्ही लोकांचे प्रश्न मांडणार आहोत, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्याचबरोबर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सगळे खुलासे केले आहेत. त्यावर अधिक काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या मुद्द्यावर भाष्य करणे टाळले.

दरम्यान छगन भुजबळ यांनी आज सकाळी ओबीसी राजकीय आरक्षणासंबंधी माझी सागर निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी यावेळी या प्रश्नात मी संपूर्ण मदत करीन, असे सांगितले. इम्पिरिकल डेटा कसा गोळा करता येईल, यासंदर्भातील चर्चा आम्ही केली. आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करून देतो. या प्रश्नात भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास आम्ही तयार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुका आहेत, त्यापूर्वी हे करणे सहज शक्य आहे, असे मी त्यांना सांगितले. भुजबळ यांनी त्याचे नेतृत्व केले, तरी काही हरकत नाही कारण ते सत्तारूढ पक्षात आहेत.