टॅक्स चोरी प्रकरणी विजयला मद्रास उच्च न्यायालयाने झापले


मद्रास उच्च न्यायालयाने तमिळ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजयला तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने सांगितले आहे की विजयने भरलेल्या दंडाची रक्कम तामिळनाडु मुख्यमंत्री कोव्हिड रिलीफ फंडमध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याच्या लग्जरी इंपोर्टेड कार रॉल्स रॉयस घोस्टचा एंट्री टॅक्स न भरल्याबद्दल उच्च न्यायालयाने हा दंड विजयला ठोठावला आहे. न्यायालयाने दंड सुनावताना विजयला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार विजयला गाडीचा टॅक्स कर विभागाला 2 आठवड्याच्या आत भरावा लागणार आहे.

विजयला टॅक्स चोरी केल्याप्रकरणी हा दंड मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एसएम सुब्रमण्यम यांनी सुनावला आहे. सोबतच आदेश देताना म्हटले आहे की, जे चाहते अभिनेत्यांना खऱ्या आयुष्यात एका हिरोप्रमाणे पाहतात, असे अभिनेते तामिळनाडू सारख्या राज्याचे शासक बनले आहेत. चित्रपटात काम करणाऱ्या हिरोकडून टॅक्स चोरी करणार अशी अपेक्षा नाही. कारण, हा ॲटीट्यूड अँन्टी नॅशनल आणि असंवैधानिक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

हे अॅक्टर्स स्वत:ला समाजात सामाजिक न्याय स्थापित करणारे चॅम्पियन समजतात. यांच्या चित्रपटात समाजात होणाऱ्या भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवण्यात येतो. पण यांनी आता टॅक्सचोरी केला आहे. न्यायालयाला हे मान्य नसल्याचे देखील मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने आदेश देताना म्हटले आहे की, एकीकडे सामान्य लोकांना टॅक्स देण्यासाठी आणि न्यायपूर्ण जीवन जगण्यास जागरुक करण्यात येते. तर दुसरीकडे धनवान आणि प्रतिभावान लोक टॅक्सचोरी करतात. अभिनेत्याने त्यांच्या लाखो चाहत्यांच्या भावना समजायला हव्यात, जे लोक तिकिट खरेदी करुन त्यांचे चित्रपट पाहतात, अशा शब्दात न्यायालयाने विजयला झापले आहे.