मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर नाना पटोले यांनी आज यासंदर्भात भाष्य केले आहे. शरद पवारांशी काँग्रेस नेत्यांच्या भेटीसंदर्भात नाना पटोले म्हणाले की, आमच्या पक्षाची स्टॅटर्जी आहे. त्यानुसार आमचे प्रभारी आणि नेते शरद पवारांना भेटायला गेले. भाजपने जे ओबीसी आरक्षण संपवले त्याविरोधात आम्ही एक आंदोलन उभे करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता होणार आहेत. केंद्राकडून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट झाली पाहीजे, यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. आमचे नेते शरद पवारांना भेटायला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, मला तिथे आमचे नेते गेलेले माहितच नव्हते. मला आमंत्रणही नव्हते. माझा कुणावर व्यक्तिगत राग नाही. मला माझ्या पक्षाचे काम करायचे आहे. माझ्या पक्षाचे काम करताना कुणाला राग येत असेल तर मला फरक पडत नसल्याचेही नाना पटोले म्हणाले.
शरद पवारांच्या नाराजीनंतर नाना पटोलेंचे भाष्य
नाना पटोले म्हणाले की, मला पक्ष मजबुत करण्याची जबाबदारी हायकमांडने दिली आहे आणि मी ती पार पाडणार आहे. मी काही शिवसेना- राष्ट्रवादीविरोधात अटॅक करत नाही. भाजप विरोधात करतो. ते म्हणाले की, 2014 मध्ये झाला तसा धोका होऊ नये म्हणून स्वबळाची तयारी करत आहोत. काँग्रेस मरणासन्न अवस्थेत अजिबातच नाही, संजीवनी नेत्यांकडे नाही जनतेकडे असते, असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोले झोटिंग समितीच्या अहवालाबाबत बोलताना म्हणाले की, बहुजन समाजाच्या नेत्यांचे देवेंद्र फडणवीसांनी खच्चीकरण केले आहे. याच कारणामुळे एकनाथ खडसेंचे खच्चीकरण झाले आहे. एखाद्या गोष्टीचा फार्स तयार करुन त्यात लोकांना गुंतवायचे हे फडणवीसांना जमते. झोटींग समितीचा अहवाल देखील फार्सच असल्याचे ते म्हणाले.
नाना पटोले यांनी सांगितलं की, उद्या दुपारी 12 वाजता सायकलवरुन इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर राज्यपालांना भेटायला जाणार आहोत. हॅगींग गार्डन ते राजभवन पर्यंत सायकल रॅली काढणार असल्याचे ते म्हणाले. सामनातील लेखाविषयी बोलताना ते म्हणाले की, सामनाने चांगले लिहीले आहे, काँग्रेसच्या हिताचेच सांगितले आहे. 2024 मध्ये देशात राहुल गाधींच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल. काँग्रेसला महाराष्ट्रात नानांनी उभारी दिल्याचे म्हटले आहे, असं ते म्हणाले. मंत्रिमंडळातील काँग्रेस मंत्र्यांच्या बदल्यांबाबत अजून निर्णय नाही. मंत्रिमंडळ बदलाचे निर्णय हायकमांड घेतील, असे ते म्हणाले.