लसीकरणावरुन टीका करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर


नवी दिल्ली – मोदी सरकारमध्ये गेल्याच आठवड्यात सामील झालेले आणि देशाच्या आरोग्यमंत्री पदाचा पदभार स्विकारलेले मनसुख मांडवीय यांनी नुकतेच टीकाकारांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी लसीकरणावरुन टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. आपल्या ट्विटमधून मांडवीय यांनी आपली मते मांडली आहेत.

मांडवीय आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, भ्रम आणि चिंतेचे वातावरण पसरवणारी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. शासनप्रक्रिया आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींपासून हे नेते एवढे दूर आहेत की त्यांना लसीकरणाबद्दल जी माहिती दिली जाते, त्याबद्दलही काही कल्पना नाही. ते पुढे म्हणतात, सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून लसीकरण व्हावे, यासाठी जून महिन्यात ११.४६ कोटी डोस राज्यांना उपलब्ध करुन देण्यात आले तर जुलैमध्ये डोसची संख्या वाढवून १३.५० कोटी करण्यात आली.

केंद्र सरकारने राज्यांना १९ जूनलाच जुलैमध्ये राज्यांना किती डोस दिले जातील याची माहिती दिली होती. त्यानंतर २७ जून आणि १३ जुलैला केंद्राने राज्यांना आधीच बरीचशी लसींबाबतची माहिती दिली होती. त्यामुळे राज्यांना हे अगदी व्यवस्थित माहित आहे की त्यांना कधी किती डोस मिळणार आहेत. कोणालाही काही अडचण येऊ नये, यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. जर आता केंद्र सरकारने आधीच राज्यांना लसीच्या उपलब्धतेबद्दलची माहिती दिली असेल आणि तरीही अयोग्य व्यवस्थापन आणि लस घेण्यासाठीच्या लांब रांगा अशा समस्या येत असतील तर त्याचे कारण स्पष्ट आहे.

ते पुढच्या ट्विटमध्ये म्हणतात, मला अनेक राज्यांकडून आणि त्यांच्या नेत्यांकडून लसींच्या उपलब्धतेबाबत पत्राद्वारे किंवा चर्चेतून माहिती मिळालेली आहे. त्या आधारावर सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे. पण नेत्यांची अशी निरर्थक वक्तव्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केली जात आहेत.