जाणून घ्या पीसीव्ही लसीचे काय आहेत फायदे?


मुंबई : आज 13 जुलैपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दीड महिन्याच्या बालकांना ‘न्‍युमोनिया’ व इतर ‘न्‍युमोकोकल’ आजारांपासुन संरक्षण देणारी ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ देण्‍यास सुरूवात करण्‍यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात मनपा आरोग्‍य केंद्रांमध्ये व रूग्‍णालयांमध्‍ये असणा-या आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 9 ते साधारणपणे दुपारी 1 या कालावधी दरम्यान ही लस मोफत दिली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

राज्‍य सरकारच्‍या निर्देशांनुसार 13 जुलै पासून सुरु करण्यात येत असलेल्या पीसीव्ही लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दीड महिन्याच्या बालकांना लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 208 ठिकाणी हे लसीकरण करण्यात येणार आहे. सदर लसीकरणाच्‍या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्‍हणून संबंधित कर्मचा-यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्‍यात आले असुन क्षेत्रीय स्‍तरावर या लसीकरणाबाबत जनजागृती करण्‍यात येत आहे. तसेच लस, सिरींजेस व इतर सामुग्री इत्यादींच्या वितरणाची व्‍यवस्‍था देखील करण्‍यात आल्याची माहिती महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याव्‍दारे देण्‍यात आली आहे.

बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारावर विस्‍तारीत लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत प्रतिबंधक लस देण्यात येते. राज्य सरकारच्या निर्देशांनुसार सदर लसीकरण मोहिमेत ‘न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ (PCV) या लशीचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे बालकांना ‘न्युमोकोकल न्युमोनिया’ आणि इतर ‘न्युमोकोकल’ आजारांपासून संरक्षण मिळु शकणार आहे.

सन 2010 मध्ये भारतात ‘न्युमोकोकल’ या आजाराने पाच वर्षाखालील अंदाजे 1 लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती. तर देशभरात त्याचवर्षी 5 ते 6 लाख बालकांना ‘न्युमोनिया’ हा गंभीर आजार झाल्याची नोंद देखील झाली होती. ‘स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया’ या जीवाणूमुळे ‘न्युमोकोकल’ हा संसर्गजन्य आजार होतो, हा आजार म्‍हणजे फुप्फुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप येतो व खोकलाही येतो, तसेच जर सदर संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास तर मेंदुज्वर, न्युमोनिया सेप्टीसिमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.