कॉकटेल अॅन्टीबॉडीजचा प्रयोग मुंबईत यशस्वी; मृत्यू दरामध्ये 70 टक्‍के घट


मुंबई : अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात आतापर्यंत सुमारे 200 पेक्षा अधिक रुग्‍णांवर कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्‍या पद्धतीने उपचार करण्‍यात आले आहेत. हा प्राथमिक प्रयोग यशस्‍वी ठरला आहे. कारण, हे मिश्रि‍त औषध दिल्‍यानंतर फक्‍त एकाच (0.5 टक्‍के) रुग्‍णास प्राणवायू पुरवठ्याची गरज भासली, तर मृत्‍यू दरामध्‍ये तब्‍बल 70 टक्‍के घट झाली आहे. एवढेच नव्‍हे तर रुग्‍णालयातील उपचारांचा कालावधी 13 ते 14 दिवसांवरुन कमी होऊन आता 5 ते 6 दिवसांवर आला आहे. अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा प्राथमिक प्रयोग करण्‍यात आला आहे. हा प्रयोग यशस्‍वी ठरला आहे.

अमेरिकेमध्‍ये नोव्‍हेंबर 2020 पासून कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाचा उपयोग करण्‍यात येत आहे. हेच मिश्रित औषधोपचार अमेरिकेचे माजी राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प हे कोरोनाबाधित झाल्‍यानंतर त्‍यांना देखील देण्‍यात आल्यानंतर त्‍यांच्‍या प्रकृतीमध्‍ये अत्‍यंत वेगाने सुधारणा झाली. भारतामध्‍ये अलीकडेच म्‍हणजे 10 मे 2021 रोजी केंद्रीय औषधी प्रमाणक नियंत्रण संघटनेने मान्‍यता दिली आहे.

कॅसिरीव्‍हीमॅब आणि इमडेव्‍हीमॅब ही अॅन्टीबॉडी औषधी आहेत. या दोन्‍ही औषधांचा कॉकटेल वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार केले जाऊ शकतात. ज्‍यांचे वय 12 वर्षांपेक्षा अधिक आणि शारीरिक वजन 40 किलोपेक्षा जास्‍त आहे, अशा बाधित रुग्‍णांना हे औषध दिले जाते. सौम्‍य ते मध्‍यम स्‍वरुपात ज्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि प्राणवायू पुरवठ्याची गरज नाही, पण प्रकृती अधिक बिघडण्‍याचा धोका आहे, अशा गटातील बाधित रुग्‍णांना हे कॉकटेल औषधोपचार दिले जातात. महत्‍त्‍वाचे म्‍हणजे, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, दमा आणि त्‍यासारखे श्‍वसनाचे इतर तीव्र आजार, उच्‍च रक्‍तदाब, सिकलसेल, मेंदूविषयक व्‍याधी इत्‍यादी आजार असले तरीही उपचार करणे शक्‍य होते.

ही कॉकटेल औषधोपचार पद्धती मुंबई महानगरपालिका आरोग्‍य प्रशासनाने प्रायोगिक तत्‍त्‍वावर प्रारंभी सेव्‍हन हिल्‍स रुग्‍णालयात राबविली आहे. आजवर 212 कोरोनाबाधितांना हे कॉकटेल औषध सलाईनद्वारे देण्‍यात आले. त्यापैकी 199 रुग्‍णांचे उपचाराअंती निष्‍कर्ष प्राप्‍त झाले आहेत. त्‍याचा सविस्‍तर अभ्‍यास प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे. या 199 रुग्‍णांमध्‍ये 18 ते 45 वर्ष वयोगटातील 101 रुग्‍ण, 45 ते 59 वर्ष वयोगटातील 45 रुग्‍ण तर 60 वर्ष वयोगटावरील 53 रुग्‍णांचा समावेश आहे. एकूण 199 पैकी 74 जणांना किमान एक तरी सहव्‍याधी आहे.

सौम्‍य ते मध्‍यम बाधा या गटातीलच हे सर्व 199 रुग्‍ण होते. उपचार सुरु करतेवेळी या 199 बाधितांपैकी 179 जणांना ताप, 158 जणांना तापासह खोकला किंवा ताप नसला तरी खोकल्‍याचा त्रास होत होता. तसेच 4 रुग्‍णांना ऑक्‍स‍ि‍जन पुरवठा करावा लागणार होता. एचआरसीटी चाचणीनुसार वर्गीकरणाचा विचार करता रुग्‍णांचा सरासरी एचआरसीटी स्‍कोअर 25 पैकी 7 ते 8 एवढा होता. सर्वाधिक एचआरसीटी स्‍कोअर 25 पैकी 11 एवढा होता.

निरिक्षणाअंती असे लक्षात आले की, कॉकटेल औषध दिल्‍यानंतर अवघ्‍या 48 तासांतच रुग्‍णांना ताप येणे थांबला. 199 पैकी फक्‍त एकाच व्‍यक्‍तिला पुढे ऑक्सिजन पुरवठा करावा लागला. हे प्रमाण अवघे 0.5 टक्‍के आहे. कोरोनाबाधितांना एरवी ऑक्सिजनची भासणारी निकड पाहता, ही बाब मोठा दिलासा देणारी आहे. कारण पहिल्‍या व दुसऱ्या लाटेमध्‍ये किमान 20 टक्‍के रुग्‍णांना प्राणवायू द्यावा लागत होता. तर 5 टक्‍के रुग्‍णांना अतिदक्षता (आयसीयू) उपचार पुरवावे लागत होते. सर्वात महत्‍त्‍वाचे म्‍हणजे कोणत्‍याही रुग्‍णावर या कॉकटेल औषधांचे प्रतिकूल परिणाम (साईड इफेक्‍टस्) आढळलेले नाहीत. तसेच मृत्‍यूंचे प्रमाण देखील तब्‍बल 70 टक्‍क्‍यांनी घटले आहे.

सदर कॉकटेल औषध सलाईनद्वारे देण्‍यासाठी एक तासाचा अवधी पुरेसा ठरतो. त्‍या कालावधीत संबंधित रुग्‍णाचे थेट निरीक्षण करता येते. रुग्‍णालयात दाखल करुन न घेता, बाह्य रुग्‍ण सेवा (ओपीडी) पद्धतीने देखील हे औषध देणे शक्‍य आहे. रेमडेसिविर सारखी औषधे आणि स्‍टेरॉईडचा उपयोग टाळून हे मिश्रित औषध देणे शक्‍य असल्‍यामुळे रुग्‍णांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळतो आहे. रुग्‍णालयात दाखल होण्‍याची गरज टाळून, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर महागड्या औषधोपचारांची आवश्‍यकता भासत नसल्‍यामुळे सदर कॉकटेल औषधोपचार आर्थिकदृष्‍ट्या देखील रुग्‍णांना फायदेशीर ठरणारे आहेत. तर वैद्यकीय मनुष्‍यबळाचा विचार करता, रुग्‍णाला ओपीडी तत्‍वावर उपचार पुरवणे शक्‍य असल्‍यामुळे आणि रुग्‍णाचा रुग्‍णालयात राहण्‍याचा कालावधी कमी होत असल्‍यामुळे डॉक्‍टरांवरील ताणही निवळण्‍यास मदत होणार आहे.

कोरोनाच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर अॅन्टीबॉडीज कॉकटेलचा हा प्रयोग यशस्‍वी होत असल्‍याचे प्राथमिक निष्‍कर्ष हाती आल्‍यामुळे महानगरपालिका प्रशासनाने या औषधांचा वापर करता यावा, यासाठी पुरेशी तयारी केली आहे. कोरोनाचा सामना करण्‍यासाठी आरोग्‍य सेवा-सुविधा सुसज्‍ज असताना, तसेच लसीकरणाला वेग दिल्‍यानंतर या नवीन औषधोपचार पद्धतीमुळे मुंबईकर नागरिकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.