क्रिती सेनॉनच्या आगामी ‘मीमी’चा ट्रेलर रिलीज


बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘मीमी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच ‘मीमी’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. क्रितीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. क्रितीने हा ट्रेलर तिच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

तिच्या स्वप्नांची एक झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. या ट्रेलरमध्ये क्रितीला एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट आई होण्यासाठी विचारण्यात येते. या साठी तिला २० लाख रुपये देण्यात येणार असतात. पण, ते जोडपे काही महिन्यांनंतर त्यांना ते बाळ नको असे सांगतात. पण, क्रिती गर्भपात करण्यासाठी तयार नसते. त्यानंतर पंकज त्रिपाठी त्या बाळाचे वडील असल्याचे खोटे क्रिती तिच्या आई-वडिलांना सांगते.

तर क्रितीच्या जवळच्या मैत्रिणीची भूमिका साकारताना सई ताम्हणकर दिसत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर प्रचंड व्हायरल झाला आहे. या चित्रपटात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे, तर हा चित्रपट ३० जुलै रोजी नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.