शरद पवारांनंतर राहुल गांधींच्या भेटीला प्रशांत किशोर


नवी दिल्ली – लागोपाठ दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता प्रशांत किशोर थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. ही भेट राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी, केसी वेणुगोपाल राव आणि हरीश रावत अशी पक्षातील काही वरीष्ठ मंडळी देखील यावेळी हजर होती. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून काम थांबवण्याचे संकेत देणारे प्रशांत किशोर अचानक पुन्हा राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी का घ्यायला लागले आहेत? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्याचबरोबर प्रशांत किशोर यांचे नेमके काय चालले आहे ? याविषयी तर्त वितर्क लढवले जात आहे. दरम्यान, आज राहुल गांधींसोबत झालेली भेट ही आगामी पंजाब विधानसभा निवडणुका आणि पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद या पार्श्वभूमीवर झाल्याचे सांगितले जात आहे.

प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्याभरात शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची कपूरथला हाऊस या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर आता प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची देखील भेट घेतल्यामुळे त्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामधील मतभेद विकोपाला गेल्याचे बोलले जात आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी याचसंदर्भात गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि नंतर त्यांच्यासोबत राहुल गांधी यांची देखील भेट घेतली होती. पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंजाब काँग्रेसमध्ये निर्माण झालेला हा कलह पक्षासाठी त्रासदायक ठरू शकतो. याचसंदर्भात प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.