देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पण महाराष्ट्र-केरळने चिंता वाढवली : आरोग्य मंत्रालय


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे, ही चांगलीच बाब आहे. पण काही राज्यांत अद्यापही कोरोना संक्रमणाची गती चिंताजनक आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैंकी ५० टक्यांहून अधिक रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांत दिसून येत असल्याचे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधोरेखित केले.

सध्या देशात ४.३१ लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रिकव्हरी रेट ९७.३ टक्क्यांवर आहे. देशात ७३ असे जिल्हे आहेत, जिथे प्रत्येक दिवशी १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. हीच संख्या २ जून रोजी २६२ जिल्हे आणि त्यापूर्वी ४ मे रोजी ५३१ जिल्हे अशी होती. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांची संख्या घटताना दिसत आहे. परंतु, महाराष्ट्र आणि केरळसहित पाच राज्य असे आहेत, जिथे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण केवळ महाराष्ट्र आणि केरळमधून समोर येत आहेत. याशिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांतही बाधितांची संख्या जास्त आहे.