महाराष्ट्रातील खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ स्पर्धा


मुंबई : राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसीपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी दिली.

स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसीपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसीपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षीसे दिली जातील. शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे.

महाराष्ट्राची खाद्य संस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी, वऱ्हाडी अशा विविध खाद्यसंस्कृती लोकप्रिय आहेत. पर्यटक महाराष्ट्रात आल्यानंतर स्थानिक खाद्यपदार्थांचा आवर्जून आस्वाद घेतात. आता महाराष्ट्रातील अशा विविध रेसीपी देश आणि जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवून त्यांना चालना देण्यात येणार आहे. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याअनुषंगानेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्याच्या विविध भागातील पाककला प्रेमींनी सहभागी होऊन महाराष्ट्राचे मास्टरशेफ बनावे, असे आवाहन संचालक डॉ.सावळकर यांनी केले आहे.

स्पर्धेत सहभागासाठी आपल्या आवडत्या महाराष्ट्रीय डिशची व्हिडिओ रेसीपी ऑनलाईन सबमिट करावयाची आहे. 11 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा असेल. व्हिडिओ किमान 30 सेकंद आणि कमाल 15 मिनिटांचा असणे आवश्यक आहे. व्हिडिओचा आकार 100 एमबीपर्यंत असावा. व्हिडीओ रेसीपीसह त्यातील घटक आणि पद्धतीची माहिती लिखीत स्वरुपातही सोबत सादर करणे आवश्यक आहे. अभिनव शूटिंग शैली, अन्नाचे सादरीकरण, प्रादेशिक महाराष्ट्रीय रेसीपी, महाराष्ट्रीय पदार्थांचा वापर, अन्नपदार्थ स्वच्छ, आरोग्यदायी ठेवण्यासाठी काळजी आदी बाबींच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाईल. मजकूर, संभाषण किंवा व्हॉईस-ओवर हा मराठी किंवा इंग्रजी भाषेत वापरला जाऊ शकतो. व्हिडिओंना कोणताही वॉटरमार्क नसावा, असे व्हिडिओ अपात्र ठरविले जातील. तज्ज्ञ शेफ्सच्या समितीमार्फत विजेत्यांची निवड केली जाईल.