काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात कोल्हापूर जिल्हा परिषद


कोल्हापूर – काँग्रेसचे राहुल पाटील यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंत शिंपी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीला ही निवड बिनविरोध करण्यात यश आले. भाजपने निवडणूक लढवण्याची तयारी केली होती; मात्र ऐनवेळी माघार घेतली.

गेल्या महिनाभर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू होत्या. आमच्याच पक्षाचा अध्यक्ष होणार असा दावा काँग्रेसचे पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. पण जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांनी मुलगा राहूल पाटीलसाठी हालचाली सुरू केल्या. त्यांनी त्यासाठी वरिष्ठ पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली. दोन्ही मंत्री व आमदार पाटील यांच्या काल रात्रीपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. आज सकाळी पुन्हा एकदा चर्चा होऊन अखेर अध्यक्षपद राहुल पाटील यांना देण्यास दोन्ही मंत्र्यांनी संमती दर्शवली. तर राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पद देण्यात आले.

दरम्यान आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या निवडणुका होणार आहे. विधान परिषदेची निवडणूक पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी महत्त्वाची आहे. तर हसन मुश्रीफ यांच्यासाठी ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवडणूक महत्त्वाची आहे. आमदार पाटील यांची मदत या दोन्हीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय आमदार पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांना सोबत केली होती. आता ते दोन्ही मंत्र्यांच्या सोबत राहणार असल्यामुळे त्यांची महाडिक यांची साथ तुटण्याची सोबत चिन्हे दिसत आहेत. याशिवाय बाजार समिती, शेतकरी संघ, कोल्हापूर महापालिका यासारख्या महत्त्वाच्या निवडणुकांतही ही त्रिमूर्ती एकत्र राहण्याची शक्यता आहे. त्याला शिवसेनेची सोबत मिळणार असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीची मुळे आणखी घट्ट रोवली जाणार, असे दिसत आहे.