नाना पटोलेंचा गंभीर आरोप; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत आहेत


पुणे – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले आहे. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याचे सांगताना नाना पटोले यांनी मला सुखाने जगू देणार नसल्याचेही म्हटले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचे सोनिया गांधींनी सांगितले आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. त्यांना मी आश्वासन देऊन आलो असल्याचे नाना पटोले यावेळी म्हणाले. काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आणायचा मानस मी केला आहे. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. मी विधानसभेत फोन टॅपिंगबद्दल उल्लेख केला होता. मला काही सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले तरी मुख्यंत्रीपद, गृहमंत्रीपद त्यांच्याकडे असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस महाराष्ट्रात उभी होत असल्याचे त्यांना माहिती आहे. आयबीचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सकाळी ९ वाजता त्यांच्या घरी नेऊन द्यावा लागतो. कुठे बैठका, आंदोलन सुरु आहे, काय परिस्थिती आहे याची माहिती द्यावी लागते. मी येथे आहे, याचीही रिपोर्ट गेला असेल. माझी सभा रात्री ३ वाजता पार पडली हे कोणाला माहिती नसेल पण त्यांना माहिती आहे. कारण त्यांच्याकडे ती व्यवस्था असल्याचे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू स्वबळाची घोषणा केल्यानंतर सरकू लागली आहे. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आरोप यावेळी त्यांनी केला.

नाना पटोले यांनी लोणावळा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. नाना पटोले कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले, मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितले. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही, असा चिमटा पटोले यांनी उद्धव ठाकरेंना काढला.

त्यांनी यावेळी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामे करतात, आपल्या लोकांची कामे करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचे ऐकायचे की नाही ते त्यांनी ठरवायचे, कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. तडजोड ज्या लोकांना करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचे नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा असल्याचेही नाना पटोले म्हणाले होते.