असे आहे भूमी वंदनेचे महत्व


शास्त्रांमध्ये पृथ्वी, म्हणजेच भूमीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. सकाळी उठल्याबरोबर उजव्या हाताने धरणीला स्पर्श करून वंदन करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून रूढ आहे. प्राचीन काळी ऋषी-मुनींनी या पद्धतीचा अवलंब करून याला धार्मिक रूप दिले. त्यामुळे आपोआपच धरणीचे आभार मानण्याची, ती मनुष्याला जे देते, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत भूमी वंदनेच्या माध्यमातून रूढ झाली. आपले शरीर देखील भूमीतत्वांनी बनलेले असून, अन्न, जल, फळे, फुले, वस्त्र आणि निवारा हे सर्व धरणीच्या योगेच आपल्याला प्राप्त होत असते. म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर भूमी वंदन केले जावे असे शास्त्रांमध्ये म्हटले आहे.

अनेकदा कलाकारांना रंगमंचावर येण्यापूर्वी धरणीला स्पर्श करून आशीर्वाद घेऊन मगच मंचावर प्रवेश करताना आपण पाहिले असेल. तसेच मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी देखील धरणीला स्पर्श करून मगच मंदिरांमध्ये प्रवेश करण्याची पद्धत आहे. अनेक ठिकाणी नवी वस्त्रे धारण करण्यापूर्वी वस्त्रांना धरणीचा स्पर्श करवून मगच नवी वस्त्रे परिधान केली जातात. हे सर्व भूमीच्या मानसपूजेचेच प्रकार म्हटले गेले आहेत. कोणत्याही इमारतीच्या निर्माणकार्याला सुरुवात करण्यापूर्वी भूमी पूजन करण्याची परंपरा आहे. या पूजेमध्ये विशेष मंत्रोच्चारण आणि होमहवन करून भूमी देवतेची प्रार्थना केली जाते. यावेळी भूमीमध्ये चांदीचा सर्प ठेवण्याची देखील पद्धत आहे.

शेतकरी नवे पीक घेण्याआधी धरणीची पूजा करून उत्तम पीक यावे यासाठी धरणी मातेकडे प्रार्थना करतात. तसेच नव्या वास्तुमध्ये प्रवेश करण्यापूर्वी वास्तूचे पूजन केले जाण्याची पद्धत आहे. जुन्या काळी, आणि आजही खेडेगावांमध्ये दररोज सकाळी उठल्यानंतर घरातील बायका घरापुढील अंगण स्वच्छ झाडून, सडा घालून सुरेख रांगोळ्या घालीत असत. यालाही भूमी वंदना म्हटले गेले आहे. व्याव्हारिक दृष्टीने पहायचे झाले, तर भूमी वंदना मनुष्याला स्वतःचा अहंकार विसरायला लावून सहनशील, धैर्यवान आणि क्षमाशील जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असते.

Leave a Comment