केसांच्या उत्तम आरोग्यासाठी वापरा ‘गार्लिक ऑईल’


औषधी म्हणून लसुणाचा वापर करण्याची पद्धत फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. किंबहुना चीन ग्रीस, रोम आणि इजिप्तमधील प्राचीन वैद्यकशास्त्रावर आधारित ग्रंथांमध्येही लसूण अनेक तऱ्हेच्या विकारांवर औषधी म्हणून वापरले जात असल्याचे उल्लेख आहेत. आयुर्वेदामध्येही लसूणाच्या सेवनाने आरोग्याला अनेक प्रकारे लाभ होत असल्याचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे लसूणाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, त्याचप्रमाणे लसूणाचा वापर करून तयार केलेले गार्लिक ऑईल केसांच्या आरोग्यासाठी उत्तम समजले जाते.

गार्लिक ऑईल, म्हणजेच लसूण मिश्रित तेलामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे केसांची मुळे बळकट होऊन केसांची लांबी झपाट्याने वाढते. कच्च्या लसूणामध्ये अनेक जीवनसत्वे आणि क्षार असतात. यामध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असून, त्यामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले कोलाजेन वाढते. लसूणातील रासायनिक तत्वांनी केंसाच्या मुळांशी रक्ताभिसरण वाढत असून, यातील कॅल्शियम आणि सेलेनियममुळे केस गळती कमी होऊन केसांची उत्तम वाढ होते. गार्लिक ऑईलच्या वापराने केसांमधील कोंडा नाहीसा होण्यास मदत होते, यामध्ये असलेले अॅलिसिन हे तत्व केसांतील कोंडा नाहीसा करणारे आहे.

गार्लिक ऑईल घरच्या घरी तयार करता येऊ शकते. यासाठी एक मोठा चमचा लसूण पेस्ट घेऊन ती एका भांड्यामध्ये गरम करून घ्यावी. लसूणाची पेस्ट बाजारातून तयार न आणता ताजा लसूण ठेचून बनविली जावी. लसूण पेस्ट थोडी गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक कप खोबरेल तेल घालावे. हे लसूण मिश्रित तेल थोडेसे रंग बदलेपर्यंत तापू द्यावे. तेलाचा रंग हलका भुरा झाला, की तेल आचेवरून बाजूला करून थंड होऊ द्यावे. थंड झाल्यानंतर हे तेल गाळून घेऊन बाटलीमध्ये भरून ठेवावे. आठवड्यातून दोन वेळा हे तेल हलके कोमट करून त्याने केसांच्या मुळांशी मसाज करावा. रात्रभर हे तेल केसांवर ठेवणे शक्य नसेल, तर हे तेल किमान दोन तास केसांवर राहू द्यावे.

गार्लिक ऑईल बनविण्याची आणखी एक पद्धत आहे. यामध्ये दहा लसूणाच्या पाकळ्या आणि एक लहान आल्याचा तुकडा एकत्र मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे. अर्धा कप खोबरेल तेल गरम करून त्यामध्ये ही पेस्ट घालावी. ही पेस्ट तेलामध्ये गरम होत जरा भुऱ्या रंगाची दिसू लागली, की तेल आचेवरून बाजूला करून थंड होऊ द्यावे. त्यानंतर हे तेल गाळून बाटलीमध्ये भरून ठेवावे. अश्या प्रकारे बनविल्या गेलेल्या गार्लिक ऑईलमुळे केसांची वाढ चांगली होतेच, शिवाय केस मुलायमही राहतात. लसूण, खोबरेल तेल आणि कांद्याचा रस एकत्र करून बनविलेल्या तेलाने केसांचा रुक्षपणा नाहीसा होऊन केस मुलायम, चमकदार दिसू लागतात. तसेच या तेलाच्या वापराने केस लवकर पांढरे होत नाहीत. हे तेल बनविण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा आणि लसूणाच्या बारा पाकळ्या एकत्र मिक्सरवर वाटून घ्याव्यात. अर्धा कप खोबरेल तेलामध्ये हे मिश्रण, पेस्टचा रंग बदलेपर्यंत उकळू द्यावे. त्यानंतर आच बंद करून तेल थंड होऊ द्यावे आणि थंड झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून ठेवावे. आठवड्यातून किमान दोन वेळा या तेलाने केसांना मसाज करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment