अमेरिकेतील या दाम्पत्याने स्कूल बसला बनवून टाकले आलिशान घर


नॅशव्हिले – जगभ्रमंती करून जीवन जगण्याचे २७ वर्षीय चेज ग्रीन व २५ वर्षांच्या मारियाजोस ट्रेजोचे स्वप्न होते; पण हे स्वप्न स्वत:सारख्याच इतर तरुणांप्रमाणे आठ तासांची नोकरी करून पूर्ण होणे शक्य नसल्यामुळे गतवर्षी त्यांनी स्वत:चे घर विकून स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला व रूटीन जॉब सोडून स्वतंत्र काम करण्यास सुरुवात केली. दोघांनी त्यानंतर आतापर्यंत व्हिस्काॅन्सिन, अॅरिझोना, प्युर्टोरिको, टेनेसी आदी अमेरिकेतील राज्ये पायाखालून घातली असून, संपूर्ण अमेरिका पाहिल्यानंतर ते इतर देशांच्या प्रवासाला निघणार आहेत.

त्यांनी हा प्रवासही खूपच स्टायलिशपणे पूर्ण केला. एका ४० फूट लांब स्कूल बसचे त्यासाठी दाेघांनी आलिशान घरात रूपांतर केले. त्यावर त्यांचे ३,५०० डॉलर्स म्हणजे सुमारे २ लाख ४२ हजार रुपये खर्च झाले. या बस वजा घरात बेडरूम, बाथरूम, टॉयलेट, शॉवर, १०० गॅलन पाण्याची टाकी, फ्रिज, किचन सिंक व फ्रीझरही आहे. तसेच या घराच्या छतावर सोलर पॅनलही असून, हे घर दोघांनी चार महिने परिश्रम घेऊन तयार केले. आता याच बस वजा घरामधून ते जगभ्रमंतीला निघाले आहेत.

चेजने याबाबत सांगितले की, यू-ट्यूबवर बस, व्हॅन आदी वाहनांचे घरात रूपांतर केल्याचे अनेक व्हिडिओ आम्ही पाहिले होते. अशा प्रकारचे जीवन जगणे मला आवडते, माझ्या वडिलांना हे ठाऊक होते. त्यामुळे त्यांनीच मला व मारियाजोसला स्वप्नातील आलिशान बस वजा घर तयार करण्यास प्रोत्साहन दिले. त्यापूर्वी आम्ही दोन हजार स्क्वेअर फुटांच्या घरात राहत होतो. आम्हा दोघांसाठी ते घर खूप मोठे असल्यामुळे आम्ही नोकरी सोडून बसला घर बनवून टाकले. मी ग्राफिक डिझायनर, तर मारियाजोस मेकअप आर्टिस्ट आहे. त्यात आम्ही फ्रीलान्सिंगचेही काम करतो. त्यातून आम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतात.

माझ्यासारखे जीवन जगू इच्छिणाऱ्यांना माझे सांगणे आहे की, जगभ्रमंती सर्व काही सोडून करणे दिसते तितके सोपे नाही. त्यासाठी स्वत:कडे पुरेसे पैसे असणे गरजेचे आहेत. तसेच प्रवासात येणारे अडथळे, होणारा त्रास सहन करण्याचीही तयारी हवी. हेच लक्षात ठेवून आम्ही दोघे प्रवासापूर्वी योग्य ते नियोजन करतो; परंतु तरीही काही ना काही अडचणी येतातच. असे असले तरी जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही जगभर फिरत राहण्याचे ठरवले आहे, असेही दोघांनी सांगितले.

Leave a Comment