रोहित पवार यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका


मुंबई – इंधन दरवाढ देशात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. राज्यभरात महागाईविरोधात काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान पेट्रोल दरवाढीसाठी भाजपचे नेते राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातील १२ रुपये राज्यांना मिळतात, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (शुक्रवार) पुण्यात बोलतांना केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे विधान हास्यास्पद असल्याचे रोहित पवार म्हणाले.

खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असे हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आले. देशात इतर कुठेही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.


यावर रोहित पवार यांनी खोटं काय आणि वस्तुस्थिती सांगणारा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रुपये मिळत असल्याचे सांगता, असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे.


रोहित पवार म्हणाले, साडेतीन पैशाच्या ठिकाणी विरोधकांना १२ रुपये दिसत असतील, तर याला काय म्हणावे? सगळीकडे अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल, तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असे धडधडीत खोटे बोलणे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारे नाही.