चंद्रकांत पाटील यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका


पुणे – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर त्यावरून आता राजकीय चर्चा आणि दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. काँग्रेसकडून मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यावर खोचक टीका करण्यात आली होती. यासंदर्भात भाजपवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तिखट शब्दांमध्ये टीका केली होती. मंत्रिमंडळ विस्तार करून काहीही फरक पडणार नाही. नुसते डबे बदलून फायदा नाही, इंजिन बदलायला हवे, असे नाना पटोले म्हणाले होते. तसेच, मंत्री बदलण्याऐवजी थेट पंतप्रधानच बदलायला हवेत, अशी देखील भूमिका नाना पटोले यांनी मांडली होती. आता त्यावर भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘पप्पू’ म्हटले आहे.

पुण्यात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात जसे एक पप्पू आहेत, तसेच महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत. ते त्यांच्या तोंडाला येईल, ते बोलत असतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता यावरून राज्यात कलगीतुरा पाहायला मिळू शकतो.

दरम्यान, यावेळी ईडीने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर आणलेल्या जप्तीसंदर्भात देखील चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले आहे. जरंडेश्वर हे हिमनगाचे टोक आहे. अशा प्रकारे मातीमोल किंमतीने विकल्या गेलेल्या कारखान्यांची चौकशी करा, अशी मागणी मी केली आहे. जे पत्र मी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना दिले, ती कारखान्यांची यादी पाच वर्षांपूर्वी अण्णा हजारेंनी तयार केली असल्याचे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, राज्यातील ३० साखर कारखान्यांची यादी चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांची भेट घेऊन दिली असून या कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर लगेचच अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण, हे सर्व काही मी यादी दिल्यानंतर झाल्याच्या चर्चेचा चंद्रकांत पाटील यांनी इन्कार केला. मी पत्र दिल्यानंतर देशाच्या सहकार मंत्रालयाचा कारभार अमित शहा यांच्याकडे गेला, असे नाहीये. याचे नियोजन किमान वर्षभरापूर्वीपासून झाले असेल. या खात्यामुळे देशातील सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.