भीमा कोरेगाव प्रकरणी नोंदवला जाणार शरद पवारांचा जबाब


मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा भीमा-कोरेगाव प्रकरणी जबाब नोंदवण्यात येणार आहे. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार घडला होता. २ ऑगस्टपासून त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज सुरु होणार असून त्या प्रकरणी शरद पवार आपला जबाब नोंदवणार आहेत. एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

महाराष्ट्र सरकाराने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाद्वारे राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात जबाब नोंदवण्यात येईल. साक्षीदारांचे जबाब २ ऑगस्टपासून नोंदवण्यात येतील व पवार यांनाही समन्स बजावले जाईल, असे चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते म्हणाले. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

ही माहिती भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात महाराष्ट्र सरकारने नियुक्त चौकशी आयोगाचे वकिल आशिष सातपुते यांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी या हिंसाचारप्रकरणी नऊ कार्यकर्त्यांना अटक केली होती. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी केली होती. जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा राज्यात भाजपप्रणित सरकार सत्तेत होते आणि हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी या विरोधी पक्षांनी केला होता.