या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येत आहे; ईडीच्या समन्सबाबत खडसेंची प्रतिक्रिया


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे अडचणीत सापडले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने काल एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केल्यानंतर एकनाथ खडसे यांना देखील समन्स बजावण्यात आले असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. खडसे ईडीसमोर हजर राहण्यापूर्वी पत्रकार परिषद घेणार होते. पण, त्यांची प्रकृती त्यापूर्वीच खालावली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ते चौकशीला हजर राहणार की नाही याबाबत शंका होती. पण ईडी कार्यालयात चौकशीला ते आज जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

एकनाथ खडसेंना ईडीने गुरुवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन, एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आजची पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना ईडी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे. चौकशी दरम्यान पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानंतर माझी चौकशी सुरू झाली असल्याचा आरोप केला. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येत आहे. मी पक्ष बदलला. ही कारवाई राजकीय हेतूने सुरू आहे. हे षडयंत्र नाथाभाऊंना छळण्यासाठीचे सुरू आहे. जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है, असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे खडसे म्हणाले.

मी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी जात आहे आणि नेहमीच ईडीला सहकार्य केले आहे. ज्या प्रश्नांबाबत आजही चौकशी करण्यात येईल, त्याबाबत मी उत्तर देणार आहे. ज्या भूखंडाबाबत चौकशी सुरु आहे, तो मुळात वादग्रस्त आहे. एमआयडीसीचा भूखंड असल्याचे सांगून अद्याप त्याचा ताबा त्यांच्याकडे नाही. भूसंपादनाची प्रक्रिया एमआयडीसीतर्फे केलेली नाही. आता एमआयडीसी या जागेवर दावा करत आहे. भूखंडाबाबत मोबदला दिल्याचे एमआयडीसीने दाखवून द्यावे, त्यानंतर हा प्रश्न राहणार नसल्याचे खडसे यांनी म्हटले.

मुळात खाजगी व्यवहार असल्यामुळे याची आधी ५ वेळा चौकशी झाली आहे. आता ५ वर्षानंतर पुन्हा ईडीच्या माध्यमातून याप्रकरणाची चौकशी सुरु आहे. भाजप सोडून मी राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतरच ही प्रक्रिया सुरु झाली. मला हेतुबद्दल शंका आहे. जळगामध्ये गेल्या ८ दिवसांपासून कुछ होने वाला है, असा मेसेज फिरत आहे. याचा अर्थ कार्यकर्त्यांना याची माहिती होती. राजकीय हेतुने हे सुरु असून मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचे खडसे म्हणाले.