दानवे यांची मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच मुंबई लोकलसंदर्भात महत्त्वाची घोषणा


नवी दिल्ली – देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. पण, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यास बंदी कायम ठेवली आहे. पण, मुंबईकरांना दिवसेंदिवस प्रवास करताना त्रास सोसावा लागत आहे. अशातच भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास करण्यास बंदी घातली आहे.

राज्य सरकारकडे लोकल सुरु करण्यासंदर्भातील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारला ज्यावेळी वाटेल, आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आली आहे आणि रेल्वे सुरु करणे गरजेचे आहे. राज्याने त्या ठिकाणचा अभ्यास करुन यासंदर्भात प्रस्ताव पाठवला, तर रेल्वे सुरु केली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नसल्याचे दानवे म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रपदाचा पदभार स्विकारताच राज्य सरकारने लोकल सुरू करण्याची विनंती केली, तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल असे आश्वासन दानवे यांनी झी २४ ताससोबत बोलताना दिले आहे.