यूआयडीएआयने आधारशी संबंधित ‘या’ २ सेवा केल्या बंद!


नवी दिल्ली – अगदी प्रत्येक गोष्टीसाठी देशात आधार कार्डचा वापर केला जातो. हे कार्ड सामान्य माणसाची ओळख म्हणून ओळखले जाते. तुम्हाला जर तुमचे आधार कार्ड अपडेट करायचे असेल, तर काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. यूआयडीएआयने (UIDAI) आधारशी संबंधित दोन विशेष सेवा बंद केल्या आहेत. ज्याचा परिणाम आधार कार्डधारकांवर होऊ शकतो. आधार कार्ड संबंधित सेवा यूआयडीएआय पुरवत असते. परंतु यावेळी त्यांनी २ विशेष सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या गेल्या आहेत.

अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची सुविधा यूआयडीएआयने बंद केली आहे. आधार कार्डधारक या सुविधेमुळे सहज आपल्या पत्त्यामध्ये बदल करू शकत होते. आधारच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या हा पर्यायही हटवण्यात आला आहे.

या शिवाय जुन्या शैलीतील आधार कार्ड रिप्रिंटची सेवाही यूआयडीएआयकडून बंद करण्यात आली आहे. मोठ्या आधार कार्ड पेक्षा आता प्लॅस्टिकचे पीव्हीसी कार्ड दिले जात आहेत. या कार्डचा आकार लहान असल्यामुळे सहज पाकीट किंवा छोट्या बॅगेत ठेवण्यासाठी ते सोपे पडत आहे. म्हणूनच जुन्या पद्धतींचे कार्ड आता बंद करण्यात आले आहेत.

याचा जास्त परिणाम भाड्याने राहणाऱ्या लोकांवर होण्याची शक्यता आहे. ते अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे सहज आपला पत्ता अपडेट करू शकत होते. परंतु आता त्यांना पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी त्रास होऊ शकतो. तसेच ज्या लोकांकडे पत्ता सुधारित करण्यासाठी कोणतेही दस्तऐवज नाहीत, त्यांना देखील अडचणी येऊ शकतात.

यासंदर्भात यूआयडीएआयने माध्यमांना सांगितले की, आपण पत्ता अपडेट करण्यासाठी इतर कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकता. इतर वैध पत्ता पुरावांच्या यादीतून आपण कोणत्याही पत्त्याच्या पुरावाद्वारे आपला पत्ता अपडेट करू शकता.