सलमान खान व त्याच्या बहिणीवर आर्थिक फसवणुकीचा आरोप


बॉलीवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान, त्याची बहिण अलवीरा खान आणि त्याची कंपनी ‘बीइंग ह्युमन’ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्याविरोधात चंदीगडमधील एका व्यापाऱ्याने आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. चंदीगड पोलिसांनी व्यापाऱ्याच्या तक्रारीची दखल घेत, सलमानसह सर्वांना समन्स बजावले असून दहा दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

अरूण गुप्ता असे सलमान व त्याच्या बहिणीविरोधात तक्रार करणाऱ्या या व्यापाऱ्याचे नाव आहे. चंदीगडमध्ये त्यांनी ‘बीइंग ह्युमन’चे एक शोरूम उघडले होते. आपली याच व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सलमान खान, अलवीरा खान, बीइंग ह्युमन कंपनीचा सीईओ प्रसाद कपारे, संतोष श्रीवास्तव, संध्या, अनुप, संजय मानव व आलोक यांना समन्स बजावले आहे.

तक्रारीनुसार, अरूण गुप्ता यांनी चंदीगडमध्ये बीइंग ह्युमनचे एक शोरूम उघडले होते. त्यांनी 3 कोटी रूपये या शोरूमवर खर्च केले आहेत. शो रूमसाठी स्टाइल क्विंटेट जुलरी प्राय. लिमिटेडशी करारही केला. शोरूम तर उघडले, पण या शोरूमसाठी लागणारे सामान त्यांना मिळाले नाही. ज्या स्टोरमधून बीइंग ह्युमनची ज्वेलरी मिळणार होती, ते सुद्धा बंद आहे. या प्रकरणी अरूण गुप्ता यांनी बीइंग ह्युमनकडे अनेकदा तक्रार केली.

परंतु त्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर त्यांनी सलमान, त्याची बहिण अर्पिता आणि बिंग ह्युमन कंपनीविरोधात आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली. त्यांनी पुरावा म्हणून कंपनीसोबत केलेल्या लिखित कराराची कॉपी देखील जोडली आहे. त्यांनी या व्यवहारात गुंतवलेले पैसे त्यांना परत मिळावे, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

अरूण गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानचे ते खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी सलमानवर विश्वास ठेवूनच गुंतवणूक केली होती. शोरुमच्या ओपनिंगसाठी स्वत: सलमान येणार होता. परंतु ऐनवेळी त्याने त्याचा मेहुणा आयुष शर्माला पाठवले होते.