राजकारणाशी ईडीच्या चौकशीचा संबंध लावणे चुकीचे : प्रवीण दरेकर


मुंबई: राजकारणाशी ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध लावणे चुकीचे आहे. कारवाई एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर होत असते, असे सांगतानाच मूळ विषयापासून पळ न काढता एकनाथ खडसे यांनी चौकशीला सामोरे जावे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी माझ्यावरील कारवाईमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझी चौकशी सुरू असल्याचे म्हटले होते. त्यावर दरेकर यांनी पलटवार केला आहे. कोणत्याही सुडभावनेने ईडीची कारवाई होत नसते. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषयापासून पळ न काढता खडसे यांनी चौकशीला समोरे जायला हवे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

चौकशीपासून कुठलीही व्यक्ती पळ काढून आपल्या बचावाकरीता मार्ग शोधत असते. तेव्हा या सर्व प्रकरणातून संशयाला बळकटी मिळते. जर आपला दोष नसेल तर योग्य ती कागदपत्र सादर करून आपले निर्दोषत्व सिद्ध करा. तसेच कोणत्याही चौकशीला सहकार्य करणे उत्तम ठरेल, असा सल्लाही दरेकर यांनी दिला आहे.

दरम्यान आज नाशिकमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस होते. ईडीकडून खडसेंची चौकशी होत असल्याबद्दल त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. जे काही याबाबत बोलायचे ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपले काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नसल्याचे फडणवीस म्हणाले.