शाळा सुरु करण्याच्या निर्णयावरुन शिक्षण विभागाचे घुमजाव


मुंबई : सोमवारी शिक्षण विभागाकडून कोरोनामुक्त भागात ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संमतीने 8वी ते 12वीचे वर्ग प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय जारी करण्यात आला, पण हा निर्णय अवघ्या काही तासांमध्ये शिक्षण विभागाने स्थगित केला आहे. काही तांत्रिक त्रुटी निर्णयात असून त्यातील दुरुस्तीच्या कारणावरून हा शासन निर्णय संकेतस्थळावरून हटविण्यात आल्याचे कारण शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. तो निर्णय दुरुस्ती करून पुन्हा जारी करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून दिली जात आहे. पण, शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय एवढ्या घाई गडबडीत घेऊन परत शिक्षण विभागाने युटर्न कसा घेतला? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

आता शाळा सुरु करण्याआधी स्थानिक पातळीवरील कोरोना स्थिती पाहून अहवाल मागवून घेण्यात येणार आहे आणि जिल्ह्यातील आढावा घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पालकांची आणि मुख्याध्यापकांची संमती आवश्यक असणार आहे आणि अहवालात सुद्धा त्याबाबत माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे आता या सर्व तांत्रिक बाबी शासन निर्णयात नमूद करण्यात येतील. त्यानंतर नव्याने शासन निर्णय टप्याटप्याने शाळा सुरु करण्याबाबत घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे. काल शासन निर्णय जाहीर करून संकेतस्थळवरून हा शासन निर्णय स्थगित करून रात्री हटविण्यात आल्याबाबत या शासन निर्णयाबाबतची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना नसल्याने गोंधळाचे वातावरण होऊन संभ्रम निर्माण झाला.