वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल; डॉक्टरची लसीकरण केंद्रातच आत्महत्या


नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यातील कंरजी येथील आरोग्य केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असतानाच तेथील डॉक्टरने आत्महत्या केली. गळफास लावून उपकेद्रांतील आरोग्य अधिकारी डॉ. गणेश शेळके (वय ४५, रा. बहिरवाडी, ता. नेवासा) यांनी आपले जीवन संपवले. जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची सुसाइड नोट पोलिसांना आढळून आली आहे. वेळेवर पगार होत नाही, अतिरिक्त कामाचा ताण दिला जातो, असा उल्लेख चिठ्ठीत करण्यात आला आहे.

करंजी आरोग्य उपकेंद्रात डॉ. गणेश शेळके समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आज सकाळपासून करंजी आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होते. दुपारी डॉ. शेळके यांनी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडे कागद व पेन मागितला. त्यानंतर त्यांनी केबिनचा दरवाजा बंद करून घेतला. बराच वेळ झाला तरी दरवाजा न उघडल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉ. शेळके यांना आवाज दिला. पण, आतून प्रतिसाद न आल्यामुळे उपस्थित कर्मचारी घाबरले. त्यांनी दरवाजा तोडला असता आतमध्ये डॉ. शेळके यांनी पंख्याला गळफास लावून घेतल्याचे आढळून आले.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता सहायक पोलीस निरीक्षक कौशल्य वाघ पथकासह घटनास्थळी आले. त्यांनी शेळके यांचा मृतदेह काढून पुढील कार्यवाही सुरू केली. तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, सकाळपासूनच डॉ. शेळेक तणावात दिसत होते. पण, त्याबद्दल ते काहीच बोलले नाही. लसीकरण सुरू असताना ते केबिनमध्ये बसून होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांनी कर्मचाऱ्याला आवाज देऊन पेन व कागद मागितला. त्यानंतर त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यावेळी कोणालाही काही संशय आला नाही. बराच वेळ झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. शेळके यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये शेळके यांनी म्हटले आहे की, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दराडे, तहसीलदार, जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करीत आहोत. वेळेवर पगार न मिळणे, अतिरिक्त कामाचा भार असा त्रास होत असल्याचे डॉ. शेळके यांनी चिठ्ठीत म्हटले आहे.