इंग्लंड क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह एकूण सात जणांना कोरोनाची लागण; बदलले 18 पैकी 9 खेळाडू


लंडन: पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या दोन दिवस आधी इंग्लंड क्रिकेट संघामध्ये भूकंप आला. तीन खेळाडूंसह पथकातील एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डावर या प्रकारामुळे संपूर्ण संघच बदलण्याची वेळ आली.

इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तानचा संघ आला असून या दौऱ्यात प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. ८ जुलैपासून याची सुरुवात होणार आहे. इंग्लंडने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत विजय मिळवला होता. पण आता कोरोनाचा हा बॉम्ब फुटल्यामुळे निम्मा संघ बदलण्याची वेळत आली. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बेन स्टोक्सला कर्णधार करण्यात आले आहे. तर १८ सदस्यांच्या पथकात ९ खेळाडू नवे आहेत.

ब्रिस्टल येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यानंतर सोमवारी सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यातील सात जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. ज्यांना कोरोना झाला आहे, त्यामध्ये तीन खेळाडू तर ४ सपोर्ट स्टाफ आहेत. या कोणाचीही नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. संपूर्ण संघाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

ECBचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाइल्स यांनी सांगितले की, ही नव्या खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. २४ तासापूर्वी या पैकी कोणीही विचार केला नसेल की त्यांना एवढ्या मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळेल. काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या कालावधीपासून चांगली कामगिरी करत आहेत. बेन स्टोक्स देखील पहिल्यांदाच देशाचे नेतृत्व करताना दिसेल.

असा आहे इंग्लंडचा नवा संघ – बेन स्टोक्स(कर्णधार), जेक बॉल, डॅनी ब्रिग्स, ब्रिडन कॅर्स, जॅक क्राऊली, बेन डकेट, लुईस ग्रेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेंन्स, शाकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रेग एवर्ट्न, मॅट पार्किंसन, डेव्हिड पेन, फिल साल्ट, जॉन सिम्पसन, जेम्स विंस