राज्यातील कोरोनामुक्त गावातील 8 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु होणार


मुंबई – कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाल्यामुळे राज्यातील निर्बंध देखील हळूहळू शिथील होत आहेत. त्यातच आता शाळा-कॉलेज संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पालकांशी चर्चा करुन ठराव करावा लागणार आहे. तसेच विशेष नियमांच्या आधारे शाळा उघण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना शाळा सुरु झाल्यानंतर टप्प्याटप्पयाने शाळेत बोलवण्यात येणार आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग या कोरोना त्रिसुत्री बरोबरच विद्यार्थ्यांनी इतर नियम देखील पाळणे आवश्यक आहे. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसता येणार आहे. तसेच दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवण्यात येणार आहे. अशाप्रकारे एका वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी बसू शकतील. एखाद्या विद्यार्थ्यामध्ये लक्षणे आढळल्यास त्याला घरी पाठवण्यात येईल. त्यानंतर लगेच त्यांची कोरोना चाचणी करण्यात येईल.

शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी त्याच गावात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिक्षकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी लागू नये, यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, कालच्या अपडेटनुसार, राज्यात कोरोनाचे 9,336 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 123 जणांचा मृत्यू झाला होता. सध्या राज्यात 1,23,225 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत घट होत असली तरी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.