ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत केली ‘खेला होबे दिवस’ साजरा करण्याची घोषणा


कोलकाता – निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या घोषणा कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करतात. तसेच या घोषणा विरोधकांवर हल्ला करण्यासाठी केल्या जातात. या घोषणांवर सगळ्या पक्षांकडून काम केले जाते. घोषणांवर भाजपचा देखील मोठा हातखंडा आहे. मोदी है, तो मुमकिन है, काँग्रेसमुक्त भारत, अशा अनेक घोषणा प्रचारादरम्यान कानावर पडतात. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान अशाच घोषणा ऐकायला मिळाल्या. भाजपने पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. पण, भाजपचा गेम तृणमूल कॉंग्रेसने पलटवला. त्यावेळी तृणमूल काँग्रेसची एक घोषणा चर्चेत आली, ती म्हणजे ‘खेला होबे’ म्हणजे खेळ होणार.

दरम्यान, ज्या घोषणेमुळे भाजपाचा खेळ खल्लास झाला होता. ती ‘खेला होबे’ घोषणा लोकांनी स्विकारल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे दिवस’ साजरा करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. निवडणुकीच्या सभांमध्ये टीएमसी आणि विशेषत: ममता बॅनर्जी यांनी वारंवार हा नारा दिला होता. त्याचे लक्ष्य थेट भाजपकडे होते. या निवडणुकीच्या घोषणेने टीएमसीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.

टीएमसीची निवडणूक घोषणा केवळ ‘खेला होबे’ नव्हे तर यासह ममता बॅनर्जी यांनी दिलेलेली आणखी एक घोषणा होती, ‘खेला होबे, देखा होबे, जेता होबे’ म्हणजे खेळा, पहा आणि जिंकू. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणेला उत्तर म्हणून ‘हरे कृष्णा हरे राम, विदा हो बीजेपी-वाम’ अशी घोषणा दिली होती.