उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज्यातील 15,511 रिक्त पदांच्या भरतीची घोषणा


मुंबई : एमपीएससीकडून राज्यातील विविध विभागातील 15,511 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. वित्त विभागाने या विभागांच्या पद भरतीसाठी मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले होते. या मुद्द्यावरुन विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती.

ज्या ज्या विभागानी रिक्त पदे भरण्याचे प्रस्ताव दिले त्याला वित्त विभागाने मंजुरी दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. त्यानुसार 2018 पासून विविध संवर्गातील रिक्त असलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यानुसार गट अ- 4417, गट ब- 8031, गट क- 3063 अशी एकूण 15,511 एवढी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास वित्त विभागाने मंजुरी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली होती. राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या. त्याचा फटका सर्वांनाच बसला. स्वप्नील लोणकरची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. लोणकर कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. राज्यात यापुढे अशी घटना घडणार नाही, या संदर्भात आम्ही काळजी घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

एमपीएससी हे मायाजाल असल्याचे म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्नील लोणकर या तरुणाने पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. स्वप्नीलने 2019 आणि 2020 मध्ये झालेली एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत यश मिळवले होते. पण पुढे या परीक्षांचाच भाग असलेली तोंडी परीक्षा दीड वर्ष झालीच नाही. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरुन विरोधकांनी अधिवेशनात राज्य सरकारवर टीका केली. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी ही घोषणा केली.