SBI Report; कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते पुढील महिन्यात


नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा देशातील प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. असे असले तरी आता देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाटही येणार असल्याची चिंताजनक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आपल्या अहवालामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, भारतात पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.

त्याचबरोबर, या अहवालामध्ये ही लाट सप्टेंबर महिन्यापर्यंत शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च अहवालामध्ये म्हटले आहे की, 7 मे रोजी भारतातील कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 10,000 कोरोनाची प्रकरणे पोहचू शकतात. पण, ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात.

अहवालानुसार, जागतिक आकडेवारीवरून समजते की, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत जास्त लोकांना कोरोनाची लागण होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या लाटेचा परिणाम जवळपास 98 दिवस राहू शकतो. या व्यतिरिक्त तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, तिसरी लाट दुसऱ्या लाटे एवढीच गंभीर असू शकते. पण, सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेचाही लोकांना फायदा होईल. या लाटेत मृतांचा आकडा दुसऱ्या लाटपेक्षा कमी असू शकतो. याचबरोबर, अहवालामध्ये म्हटले आहे की, विकसित देशांमध्ये दुसऱ्या लाटेचा कालावधी 108 दिवस आणि तिसऱ्या लाटेचा कालावधी 98 दिवसांचा आहे. यादरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी, जर चांगली तयारी केली गेली, तर मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकतो.

लहान मुलांवर या तिसऱ्या लाटेचा परिणाम अधिक दिसून येऊ शकतो. तसेच, यादरम्यान, सर्व लोकांचे प्राधान्य कोरोनावरील लस असले पाहिजे. देशात 12-18 वर्ष वयोगटातील 15-17 कोटी मुले आहेत. विकसित देशांप्रमाणेच या वयोगटातील लसी विकत घेण्यासाठी भारतानेही आगाऊ धोरण आखले पाहिजे, असे अहवालामध्ये म्हटले आहे.