
कोईंम्बतूर – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. आता कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत असल्यामुळे काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. दारूची दुकाने सुद्धा लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आली होती. त्यामुळे तळीरामांची मोठी पंचाईत झाली होती. दरम्यान, तामिळनाडूच्या कोईंम्बतूरमध्ये दोन महिन्यापासून बंद असलेली दारूची दुकाने पुन्हा उघडण्यात आल्यामुळे तळीरामांनी आनंद साजरा करण्यासाठी गाण्यावर ठेका धरत चक्क फटाके आणि नारळ फोडले.
या राज्यातील तळीरामांनी दारूची दुकाने उघडताच फटाके फोडून साजरा केला आनंद
कोईंम्बतूरसह ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे त्याठिकाणी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तसेच या व्यतिरिक्त काही जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र, ११ जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडायला कोणताही मार्ग नव्हता.
तामिळनाडूमध्ये रविवारी ३८६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. परिस्थिती सुधारत असल्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये आणखी सुट देण्याची घोषणा केली. यामध्ये कोईंम्बतूरसह ११ जिल्ह्यातील दारूची दुकाने पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. तामिळनाडूमधील द्रमुक सरकारने दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकारण तीव्र झाले आहे. भाजपनंतर विरोधी पक्ष एआयडीएमकेनेही या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
