प्रणव मुखर्जींच्या मुलाचा तृणमूलमध्ये प्रवेश


कोलकाता – आज ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी यांनी प्रवेश केला आहे. २०१२ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अभिजित मुखर्जी यांनी बंगालमधील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि जिंकली होती. काँग्रेसने त्यांना या जागेवरुन २०१९ मध्येही तिकीट दिले, पण त्यांचा पराभव झाला होता.

ज्या प्रकारे भाजपच्या जातीय हिंसाचाराच्या लाटेला ममता बॅनर्जी यांनी रोखले, मला विश्वास आहे की भविष्यात इतरांच्या पाठिंब्याने त्या संपूर्ण देशात अशीच कामगिरी करू शकतील, असे अभिजीत मुखर्जी यांनी म्हटले. प्राथमिक सभासद वगळता मला काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही गटामध्ये सामील केले नव्हते. म्हणून मी टीएमसीमध्ये सैनिक म्हणून रुजू झालो आहे आणि पक्षाच्या सूचनांनुसार काम करेन. अखंडता आणि धर्मनिरपेक्षता राखण्यासाठी मी काम करेन, असे अभिजित मुखर्जी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बरेच नेते तृणमूलमध्ये सामील होत आहेत. नुकतेच मुकुल रॉय यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आता अभिजित मुखर्जीही तृणमूलमध्ये दाखल झाले आहेत.