भाजप आमदारांनी आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला, परंपरेला काळीमा फासण्याचे पाप केले – भास्कर जाधव


मुंबई – आजपासून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली. पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढेच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाल्याचे समोर आल्यानंतर भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत, सभात्यागही केला.

राज्यातील राजकीय वातावरण या घडामोडींमुळे चांगलेच तापले आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान, शिवसेना आमदार व तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देताना, भाजपवर जोरादरा टीका केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम भाजप आमदारांनी केल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.

भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले, सत्ताधारी व विरोधी पक्षांनी दोघांनी मिळून एकत्र येऊन, महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने अधिकाधिक निर्णय कमी वेळात, जास्तीत जास्त निर्णय करून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे की या कमी कालावधीच्या अधिवेशनात, महाराष्ट्रातील रोजगाराच्या निमित्त वेगवेगळ्या ज्या समाज संघटना आंदोलन करत आहेत, त्यांना न्याय काय मिळणार आहे? करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नक्की काय उपाययोजना करणार आहे? मागील दीड वर्षात कोरोनामुळे जे काय सगळ्याच क्षेत्रात आपण थोडे मागे गेलेलो आहोत, त्या अनुषंगाने सरकार काय निर्णय घेतयं किंवा सरकारकडून काय निर्णय करून घेतले पाहिजे, अशा अर्थाने दोन दिवसांच्या कमी कालावधीच्या अधिवेशनात जास्तीत जास्त सकारात्मक निर्णय करून घेण्याच्या दृष्टीने, सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकत्रितपणे काम करणे अपेक्षित आहे आणि त्यांच्याकडून ते काम करून घेणे, हे जे कुणी सभाध्यक्ष असतात त्यांनी ते करून घेतले पाहिजे.

अशा पद्धतीचा विचार हा राबवणारा अंमलात आणणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि आज त्याच पद्धतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात या सभागृहातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकासआघाडी तर्फे जो प्रस्ताव आणला, त्या प्रस्तावावर खरे पाहिले तर पहिल्यांदा मंत्र्यांनी बोलायला हवे होते. परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी परवानगी मागितली. मी त्यांना त्यावर बोलायला संधी दिली. पूर्ण वेळ त्यांचे बोलणे होईपर्यंत कुठेही मी त्यांना थांबवले नाही आणि नंतर मग मंत्रीमहोदयांनी आपले विचार मांडले. स्वाभाविक आहे, सगळ्यांचा हेतू जर एकच आहे, तर प्रस्ताव एक मताने हा केंद्र सरकारकडे पाठवण्यात अडचण काहीच असता कामा नये.

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने या पूर्वीचे देखीव प्रस्ताव हे आणले त्यावेळी देखील सभागृहातून एकमताने गेलेले आहेत. ज्या-ज्या वेळी भाजप-शिवसेनेच्या सरकारने प्रस्ताव आणलेले आहेत, त्याही वेळी एकमताने कुठलीही चर्चा न होता गेलेले आहेत. आजचा प्रस्ताव देखील एक मताने आणि अध्यक्ष या नात्याने संधी दिलेली असताना देखील मंजुर करायला हवा होता. परंतु काही लोकांना ओबीसींना आरक्षण मिळूच द्यायचे नाही. ओबीसीचा विषय सभागृहात आपण म्हणू तोच खरा आहे, अशा पद्धतीने वागणे आणि सभागृहाच्या बाहेर जे खोटे आरोप केले जातात, तेच आरोप आम्ही सभागृहात करू आणि ते जनतेने खरे मानावे अशी ज्यांची अपेक्षा होती, त्यांना छगन भुजबळ यांनी सत्य पुराव्यानिशी आणि खरी उत्तरे दिल्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि त्या अस्वस्थतेतून हा सगळा प्रकार सभागृहात घडला, हे मी निदर्शनास आणू देऊ इच्छितो.

तसेच, हा सभागृहातील प्रकार सभागृहातच थांबवण्याची प्रथा आहे. नाराजी व्यक्त करणे, ओरडणे, गोंधळ घालणे, सभागृहाच्या कामकाजात अडथळे आणणे हे नित्याचेच का सर्वसाधारणपणे असते, परंतु आज महाराष्ट्राच्या संस्कृतीला, संस्काराला, पंरपरेला आणि महाराष्ट्राच्या एक वैचारिक विचारसरणीला काळीमा फासण्याचे पाप भाजपच्या आमदारांनी केले आहे. मी सभागृहाचे कामकाज संपवून सभागृह दहा मिनिटे स्थगित केले का? तर काही चुकले असेल तर विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्ष अध्यक्षांच्या दालनात बसतात आणि काही त्यातून मार्ग काढतात या उद्देशाने कुणीही न सांगता दहा मिनिटांसाठी मी सभागृहाचं कामकाज स्थगित केले, कारण मला देखील एवढ्या वर्षांचा अनुभव आहे आणि मी नुसता अध्यक्षांच्या दालनात आलो, तर त्यावेळी स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सगळे वरिष्ठ आमदार व नवनिर्वाचित आमदार हे सगळे माझ्या एकट्यावर तुटून पडले.

वरिष्ठ नेत्यांना मी सांगत होतो की तुम्ही या सर्वांना समजावून सांगा की सभागृहाचा विषय हा सभागृहातच संपतो. सभागृहाच्या बाहेर आल्यावर तो व्यक्तिगत घ्यायचा नसतो, अशा पद्धतीने हाणामाऱ्या करायच्या नसतात. परंतु त्यांनी मला की जे विरोधी पक्ष नेत्यांनी देखील मान्य केलेले आहे की आमच्या दोन-तीन लोकांकडून काही चुकीचे शब्द गेले, हे त्यांनी सभागृहात मान्य केलेले आहे. शिवीगाळ केली, माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला. मला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या, असा अश्लाघ्य प्रकार महाराष्ट्राच्या विधानसभेत जो स्वतः आमही सुसंस्कृत आहोत, आम्ही म्हणजे अतिशय विचारी लोकांचा, सुसंस्कृत लोकांचा आणि सभ्य लोकांचा पक्ष असल्याचा टेंभा मिरवतात, त्या लोकांकडून अशाप्रकारचं कृत्य व्हावे आणि त्याला वरिष्ठ नेत्यांनी पाठिंबा द्यावा, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे भास्कर जाधव यांनी बोलून दाखवले आहे.