बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमिर खान आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी हा निर्णय आपल्या 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर घेतला असल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. अनेक चित्रपटांच्या प्रोजेक्टवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक प्रोजेक्टवर या दोघांनी एकत्रित काम केले आहे. आम्ही दोघे विभक्त होत असलो, तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्रित राहू असे या दोघांनी म्हटले आहे.
आमीर खान आणि किरण राव होणार विभक्त
एक संयुक्त निवेदन आमिर खान आणि किरण राव यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आम्ही 15 वर्षाच्या सुंदर संसारामध्ये सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहोत. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आल्याचे आम्हाला वाटते.
आमिर खान आणि किरण राव आपल्या संयुक्त निवेदनात पुढे म्हणतात की, आम्ही एकमेकांपासून विभक्त होत असलो, तरी आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर एकत्रित काम करणार आहोत. आमच्या या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचे आम्ही आभार मानतो, कारण आम्ही हा निर्णय त्यांच्या पाठिंब्याशिवाय घेऊ शकलो नसतो.
पुढे आमिर आणि किरण रावने म्हटले आहे की, आमच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आभार मानतो. आमच्या प्रमाणेच, आमच्या हितचिंतकांनीही या घटस्फोटाकडे सहजीवनाचा शेवट झाला अशा अर्थाने पाहू नये. ही एक नवीन सुरुवात आहे असाच अर्थ घ्यावा. आमिर खान आणि किरण राव हे बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून ओळखले जायचे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती.