भारत बायोटेकची Covaxin डेल्टा व्हेरिएंट विरोधात 65.2 टक्के प्रभावी


नवी दिल्ली : नुकतेच हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी कोरोना लसीच्या तिसऱ्या चाचणीचे परिणाम समोर आले असून ही लस त्यानुसार कोरोना विरोधात 77.4 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ही लस डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

ही लस कोरोनाच्या गंभीर स्वरुपातील संक्रमणाविरोधात 93.4 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. असिम्टोमॅटिक प्रकारात ही लस 63 टक्के प्रभावी आहे. आपल्या तिसऱ्या फेजच्या चाचणीमध्ये 18 ते 98 वर्षे वयोगटातील 25,800 स्वयंसेवकांना कंपनीने सामिल करुन घेतले होते. याची चाचणी देशभरातील 25 ठिकाणी घेण्यात आली होती.

भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंट हा जबाबदार असल्यामुळे भारतात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात लसीकरणाची मोहीम सुरु करण्यात आली असून सध्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस देण्यास सुरु आहे.

भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर हैदराबादच्या भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन ही अधिक प्रभावी असल्याचे पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून या आधीच स्पष्ट झाले होते. अमेरिकेच्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या एका संशोधनातूनही कोव्हॅक्सिन लस ही कोरोना व्हायरसच्या अल्फा आणि डेल्टा दोन्ही स्वरुपांवर प्रभावी ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.