लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देताना राज ठाकरे भावूक


मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे श्वानप्रेम आपल्या सर्वांनाच माहित आहे. सोमवारी (28 जून) रात्री त्यांच्या जेम्स नावाच्या श्वानाचे निधन झाले आणि त्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वत: मुंबईतील परेलमधील प्राण्यांच्या स्मशानभूमीत उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे लाडक्या जेम्सला निरोप देताना भावूक झालेले दिसले.

साडेबारा वर्ष राज ठाकरे यांच्या जेम्स या श्वानाचे वय होते. त्याला मागील काही दिवसांपासून चालायला त्रास होत होता. वयोमानानुसार सोमवारी रात्री त्याचे निधन झाले. राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब श्वानप्रेमी असल्यामुळेच लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते.

राज ठाकरे यांच्याकडे तीन श्वान होते. बॉण्ड, शॉन आणि जेम्स अशी त्यांची नावे होती. बॉण्ड आणि शॉन यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. शॉन कॉनरी हा राज ठाकरे यांचा हॉलिवूडमधील आवडता अभिनेता होता. त्याने जेम्स बॉण्ड हा चित्रपट केला होता. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन श्वानांची नावे जेम्स आणि बॉण्ड अशी ठेवली होती. तर तिसऱ्या श्वानाचे नाव शॉन असं ठेवले होते.

त्यातील जेम्सचेही आता निधन झाल्यामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब गहिवरले. सार्वजनिकरित्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. परंतु लाडका श्वान जेम्सला अखेरचा निरोप देताना ते भावूक झाल्यामुळे ते कॅमेऱ्यापासून दूर झाले.