राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिकेत सत्ता राबवण्यासाठी आयुक्तांचा वापर?


पुणे : भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पुणे महापालिकेच्या कारभारावरुन सध्या संघर्ष पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (29 जून) मंत्रालयात पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी बैठक बोलावली आहे. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांना या बैठकीचे निमंत्रण दिले असले तरी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निमंत्रण दिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्ता राबवण्यासाठी आयुक्तांचा वापर करत असल्याचा आरोप भाजप करत आहे. तर भाजपला कारभार करता येत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याच्या मंत्रिमंडळातील आठ मंत्री, वेगवेगळ्या पाच खात्यांचे सचिव आणि पुणे महापालिकेचे आयुक्त उपस्थित असणार आहेत. तसेच पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारही या बैठकीला उपस्थित असतील. पण पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना या बैठकीला आमंत्रण देण्यात आलेले नाही. पुणे महापालिकेच्या अखत्यारित येणारे विषय बैठकीत चर्चिले जाणार आहेत. जसे की पुणे महापालिकेतर्फे म्हाडाच्या इमारतीचा पुनर्विकास, जुन्या शाळांच्या काही जागा महापालिकेला हस्तांतरित करणे असे हे विषय आहेत.

भाजपची पुणे महापालिकेत सत्ता आहे, भाजपचे तब्बल 100 नगरसेवक आहेत. पण राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महापालिकेत अजित पवार यांच्या मर्जीतील आयुक्त आले आहेत. त्यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो.