भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्या प्रकरणी ‘ट्विटर इंडिया’च्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल


लखनौ – सोमवारी भारताचा चुकीचा नकाशा ट्विटर या लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग कंपनीने दाखवला होता. देशभरात याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर सायंकाळी उशिरा ट्विटरने हा नकाशा मागे घेतला. जम्मू व काश्मीर आणि लडाख हे या नकाशामध्ये भारताचाच भाग न दाखवता स्वतंत्र देश म्हणून दाखवण्यात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी गु्न्हा दाखल केला असून, ट्विटर इंडियाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्या नावाचाही एफआयआरमध्ये समावेश आहे.

हा नकाशा ‘ट्वीट लाईफ’ या शीर्षकाखाली ट्विटरच्या वेबसाईटवरील करिअर विभागात दिसत होता. नेटिझन्सनी याचा निषेध करत ट्विटरवर कठोर कारवाईची मागणी केली होती. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही लेह हा चीनचा भाग दाखवला होता. ट्विटरला या मुद्यावरुन पाठवलेल्या ई-मेलला त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी सायंकाळी उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष माहेश्वरी यांच्यासह न्यूज पार्टनरशिप हेड अम्रिता त्रिपाठी यांना याप्रकरणी सहआरोपी करण्यात आले आहे.

भारत सरकारशी अमेरिकेतील ट्विटर या बड्या कंपनीचा संघर्ष सुरू आहे. वारंवार आठवण देऊनही ट्विटरने देशाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक नव्या नियमांचे उल्लंघन केले आहे किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात ही कंपनी अपयशी ठरल्याचा ठपका सरकारने ठेवला आहे. ट्विटरने भारताचा चुकीचा नकाशा दाखविण्याची ही कृती या कंपनीला प्रकाशक म्हणून कायदेशीर उत्तरदायी ठरविण्यास पुरेशी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.