ड्रोन्स हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बोलावली उच्चस्तरीय बैठक


नवी दिल्ली – रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता. त्याच्या स्फोटात हवाई दलाचे दोन अधिकारी जखमी झाले आहेत. केंद्राने आता या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सायंकाळी ४ वाजता या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीचा अजेंडा काय असेल हे अद्याप समजू शकलेले नाही, पण यात अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. या बैठकीत देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक बडे अधिकारीही भाग घेतील. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. हवाई दलाच्या तळावर हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सर्व सुरक्षा संस्था सतर्क करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

रविवारी दहशतवाद्यांनी ड्रोन विमानातून स्फोटके पाठवून भारतीय हवाई दल केंद्रावर हल्ला केला होता, त्यात दोन बॉम्बचा समावेश होता. त्यात दोन अधिकारी जखमी झाले होते. ड्रोन्सच्या मदतीने जम्मूत करण्यात आलेला हा पहिलाच हल्ला होता. सोमवारी रातनुचाक-कालुचाक लष्करी भागात दोन ड्रोन्सवर लष्कराच्या जवानांनी सतर्कता दाखवत गोळीबार केला. एक ड्रोन विमान रविवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा हद्द ओलांडून आले होते. त्यानंतर दुसरे ड्रोन पहाटे २.४० वाजता आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेथे उपस्थित सैनिकांनी गोळीबार करताच ही दोन्ही ड्रोन विमाने माघारी गेली.