नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहकार माजवला. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असून २१ जूनपासून देशातील १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. पण, कोणताही निर्णय गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत घेण्यात आला नव्हता. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने गर्भवती महिलांना कोरोना लस देण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
गर्भवती महिलांना कोरोना लस देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना
गर्भधारणेमुळे कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढत नाही. पण बहुतेक गर्भवती स्त्रियांना लक्षणे नसतील किंवा सौम्य आजार असतील, तर त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडू शकते. त्यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्या संसर्गापासून स्वत: ला वाचवण्यासाठी त्यांनी सर्व सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यामुळे गर्भवती महिलांनी आधीच कोरोना लस घ्यावी, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनाव्दारे दिला होता.
नव्या मार्गदर्शक सुचनेत मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना लस सुरक्षित आहे आणि कोरोनापासून गर्भवती महिलांचे संरक्षण करते. कोणत्याही औषधाप्रमाणेच, लसीचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात, जे सहसा सौम्य असतात. जसे की सौम्य ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे किंवा लसीकरणानंतर १-३ दिवसांपर्यंत अस्वस्थता जाणवते. तसेच लसीकरणानंतर २० दिवसात फारच कमी गर्भवती महिलांमध्ये काही लक्षणे दिसू शकतात, ज्यावर त्वरित लक्ष देण्याची गरज असते. त्याचबरोबर जर एखाद्या महिलेस गर्भधारणेदरम्यान कोरोनाची लागण झाली असेल, तर प्रसूतीनंतर लगेचच लसीकरण करावे, असे देखील मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सुचनेत सांगितले आहे.
गर्भवती महिलेला जर कोरोनाची लागण झाली, तर त्यातील ९० टक्के महिला रुग्णालयात दाखल न होता घरीच बऱ्या होतात. तर तीव्र लक्षणे असलेल्या महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागते. कोरोनामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
तसेच मंत्रालयाने मार्गदर्शक सुचनेत मुलांच्या आरोग्याबद्दल असलेल्या भीतींविषयी माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह मातांपैकी ९५ टक्के पेक्षा जास्त नवजात बाळ जन्मतःच चांगल्या स्थितीत होते. काही प्रकरणांमध्ये, कोरोनामुळे वेळे आधी प्रसूती होण्याचा धोका वाढवू शकतो. तसेच मुलाचे वजन २.५ किलोपेक्षा कमी असू शकते.