ईडीसमोर ऑनलाईन जबाब नोंदवणार अनिल देशमुख : सूत्र


मुंबई : पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. ईडीने त्यांना आज सकाळी अकरा वाजेपर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. पण परंतु, अनिल देशमुख आजही ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. देशमुखांची प्रत्यक्ष चौकशीऐवजी ऑनलाईन जबाब देण्याची तयारी असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सध्या वकीलांची देशमुखांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर खलबते सुरु आहेत. गृहमंत्री असताना देशमुख ज्ञानेश्वरी या बंगल्यावर राहत होतो. पण ते सध्या तिथेच असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळत आहे. अनेक वकील आज सकाळपासूनच ज्ञानेश्वरी या बंगल्यावर दाखल होत आहेत.

ईडीचे शुक्रवारी धाड सत्र संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले होते. पण, शनिवारी दिलेल्या नोटीशीनंतर अनिल देशमुख यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीने अनिल देशमुख यांना आज (मंगळवारी) चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण, अनिल देशमुख आजही ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती, सुत्रांकडून मिळत आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर वकिलांची खलबते सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी माहिती दिली की, काही कागदपत्रे घेऊन यायची आहेत. हे ईडीने सांगितले नाही. मी आता ईडी कार्यालयात जाऊन काय कागदपत्रे मागितली आहेत, हे पाहणार आहे. अजून जामीनासाठी न्यायालयात गेलो नाही. कागदपत्रे मिळाल्यानंतर अनिल देशमुख आज ईडी समोर जाण्याची शक्यता आहे. पण ईडीला जे पत्र अनिल देशमुखांकडून देण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते प्रत्यक्षात चौकशीला हजर राहू शकत नाही. तर व्हिडीओच्या माध्यमातून ते चौकशीला हजर राहतील. पण त्याआधी ईडीने संबंधित प्रश्नांची यादी आणि त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे दाखवावी.

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी छापे टाकले होते. त्यांच्या घरात सकाळपासून झाडाझडती सुरु होती. अनिल देशमुख ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी होते. यावेळी देशमुख आणि त्यांची मुलगी बंगल्यावर होते. दरम्यान, वरळी आणि नागपूर येथे तपास पूर्ण झाला असून दोन्ही ठिकाणी देशमुख कुटुंबियांचे स्टेटमेंट घेण्यात आले.

शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या होत्या. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर रात्री उशीरा त्यांना अटकही करण्यात आली. ईडीने देशमुख यांच्या घरातील प्रत्येक किल्ली मागून अगदी एक एक ड्रॉवर परत तपासले. यावेळी सर्व कागदपत्रे पाहण्यात आली. ईडीच्या टीमने देशमुख यांची चौकशी केली नाही. सव्वा तीन तासाने ईडी टीम निघून गेली. तिथुन देशमुख वरळीच्या घरी पोहोचले.