दिल्ली सायबर सेलने POCSO अंतर्गत ट्विटरविरोधात दाखल केला गुन्हा !


नवी दिल्ली – सोशल मीडियासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे ट्विटरला असलेले कायदेविषयक संरक्षण हटवण्यात आल्यामुळे ट्विटरला भारत सरकारशी घेतलेल्या पंग्यामुळे मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नुकतेच ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महेश्वरी यांच्याविरुद्ध भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दर्शवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता अजून एका प्रकरणात ट्विटरविरोधात दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरविरोधात चाईल्ड पॉर्नोग्राफिक मजकूर ट्विटरवर असल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे.

ट्विटरविरोधात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स अर्थात NCPCR ने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. सायबर सेलने या तक्रारीची दखल घेत ट्विटरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. POCSO आणि आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहान मुलांच्या शोषणासंदर्भातला मजकूर किंवा लिंक ट्विटरवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल करताना नमूद करण्यात आले आहे. Twitter Inc आणि Twitter India Pvt Ltd या दोन्हींची नावे गुन्हा दाखल करताना नमूद करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, ५ जुलैपर्यंत ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महेश्वरी यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद पोलिसांनी मनिष महेश्वरी यांना चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मनिष महेश्वरी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी न्यायालयाने ५ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. विशेष म्हणजे ही याचिका उत्तर प्रदेश पोलिसांनीच पुढे ढकलण्याची विनंती केली होती.