उत्तर प्रदेशात 100 जागांवर निवडणूक लढवणार ओवैसींचा पक्ष


लखनौ : पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी बसपाशी युती करण्याच्या बातम्या आल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, आम्ही ओम प्रकाश राजभर साहेब याच्या भागीदारी संकल्प मोर्चासोबत आहोत, आम्ही निवडणुका किंवा युतीसंबंधात इतर कोणत्याही पक्षाशी बोललो नाही.

असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेश निवडणुकीसंदर्भात काही गोष्टी मला तुमच्यासमोर मांडायच्या आहेत, आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही 100 जागांवर आपले उमेदवार उभे करू, पक्षाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू केली असून आम्ही उमेदवारांसाठी अर्ज जारी केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे शनिवारी असे वृत्त होते की बहुजन समाज पार्टी उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी युती करतील. पण, बसपाच्या सुप्रीमो मायावती यांनी ट्विटद्वारे या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. आता असदुद्दीन ओवेसी यांनीही अशा बातम्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी युती करणार असल्याच्या वृत्ताचे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी खंडन केले आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट करत या चर्चांना खोटे सांगितले आहे. आपल्या ट्विटमध्ये मायावती यांनी म्हटले आहे की, ही दिशाभूल करणारी आणि तथ्य नसलेली बातमी आहे, यात काहीही सत्य नाही.