एलोन मस्क झाले ५० वर्षांचे, असे आहे आयुष्य

आज २८ जून रोजी टेस्ला सीईओ आणि स्पेस एक्स कंपनीचे संस्थापक एलोन मस्क यांनी वयाची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. २८ जून १९७१ ला जन्मलेल्या मस्क यांनी अर्धशतकाच्या या आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे आणि आज जगातील श्रीमंत व्यक्ती मध्ये स्थान मिळविले आहे. त्यांचा हा प्रवास युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मस्क यांनी नेहमीच नुसते बोलण्यापेक्षा करून दाखविण्यावर भर दिला आहे.

मस्क यांच्या डोक्यात सतत काही ना काही नव्या कल्पना जन्म घेत असतात. असे म्हणतात की मस्क यांची सेकंदाची कमाई ६७ लाख आहे. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी पहिली कमाई केली होती. द. आफ्रिकेत जन्मलेले मस्क वयाच्या १७ व्या वर्षी कॅनडा येथे आले. त्यांना पुस्तक वाचनाचा प्रचंड नाद आहे. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करायला सुरवात केली आणि १२ व्या वर्षी ब्लास्टर नावाचा व्हीडोओ गेम तयार केला. हा गेम स्थानिक मासिकाने त्यावेळी ५०० डॉलर्स देऊन विकत घेतला होता. ही मस्क यांची पहिली व्यावसायिक कमाई होती.

मस्क यांची आई मॉडेल आणि डायटीशीयन आहे तर वडील इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर. १९९५ मध्ये एलोन अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली मध्ये पीएचडी करण्यासाठी आले. त्यांनी स्टॅनफर्डला प्रवेश घेतला पण अवघ्या दोन दिवसात त्यांनी शिक्षण सोडून दिले आणि भावाबरोबर स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतला. ते दिवस इंटरनेटचे सुरवातीचे दिवस होते. त्यांनी झिप टू नावाची ऑनलाईन बिझिनेस डिरेक्टरी काढली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून एक्स डॉट कॉम ही कंपनी सुरु केली. ही कंपनी आज पे पाल नावाने ओळखली जाते.

२००२ मध्ये ही कंपनी इबे ने १६५ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केली होती. २००४ मध्ये म्हणजे २७ व्या वर्षी त्यांनी टेस्लाचा पाया घातला होता.  मस्क यांची तीन लग्ने झाली असून त्यांना सहा मुले आहेत. पहिली पत्नी लेखिका जस्टीन होती. हा विवाह ८ वर्षे टिकला. नंतर मस्क यांनी ब्रिटीश अभिनेत्री तालुला राईली हिच्यासोबत विवाह केला, तो ३ वर्षे टिकला. नंतर एनर हार्ड या अभिनेत्रीबरोबर रिलेशनशिप होती पण त्याचा ब्रेकअप झाला. आता गर्लफ्रेंड बरोबर मस्क राहत असून गेल्या वर्षी त्यांना मुलगा झाला आहे.