धनकुबेर एलोन मस्क छोट्याश्या घरात झाले शिफ्ट

स्पेस एक्सचे संस्थापक आणि जगातील धनकुबेर यादीत पहिल्या पाचात असलेले एलोन मस्क ४०० चौरस फुटाच्या छोट्याश्या घरात राहायला गेले आहेत. त्यांनी स्वतःच या घराचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा मस्क सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी त्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांची अलिशान घरे विकणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी टेक्सास येथील त्यांची मोठी हवेली विकल्याचे समजते. मस्क सध्या राहायला गेलेल्या छोट्या घराची किंमत ३७ लाख (५० हजार डॉलर्स) असून ते टेक्सासच्या बोको चिका मध्ये आहे. येथेच मस्क यांच्या स्टार कंपनीचा बेस आहे.

मस्क यांचे नवे घर अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन केले गेले आहे. स्टुडीओ स्टाईल असलेल्या या घरात इंटिरियर अगदी कमीत कमी असून एकच चौकोनी जागा विविध कारणासाठी वापरण्याची सुविधा केली गेली आहे. यात लाउंज स्पेस आहे, बाथरूम, किचन एरिया, डबल बेड रूम आहे. बेड भिंतीला उभा करता येतो. बाथरूम शेजारी तीन माणसांचे डायनिंग टेबल असून लिव्हिंग एरियामध्ये आरामदायी सोफा आहे.

मस्क सांगतात, नवे घर खुपच मस्त आहे आणि मी येथे खूप आनंदात आहे.