टेस्लाला टक्कर देण्यासाठी अमेरिकन ट्रायटनची भारतात गुंतवणूक

अमेरिकेतील प्रमुख इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ट्रायटन इलेक्ट्रिक व्हेईकलने जगातील बडी इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाला आव्हान दिले असून भारतात तेलंगाना येथे नवा प्रकल्प उभारण्यासाठी २१०० कोटींची गुंतवणूक केली आहे. जाहिराबाद येथे हा प्रकल्प उभारला जात असून त्यासंबंधीचा करार नुकताच केला गेल्याचे समजते.

भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचा विकास वेगाने होऊ लागला आहे. त्यामुळे नवी उत्पादने सातत्याने बाजारात आणली जात आहेत. यामुळे ट्रायटनने अल्ट्रामॉडर्न इलेक्ट्रिक वाहन उत्पादन प्रकल्प भारतात स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे २५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. इलेक्ट्रिक सेमीट्रक, सेदान, लग्झरी एसयुव्ही आणि रिक्षासह पुढील पाच वर्षात ५० हजार वाहने येथे बनविली जाणार आहेत.

यावर्षाच्या सुरवातीला आणि टेस्लाच्या भारत एन्ट्रीच्या पार्श्वभूमीवर ट्रायटनने ही गुंतवणूक करण्याची योजना आखली होती. त्यावेळी कंपनीने ट्रायटन एन ४ ही नवी इलेक्ट्रिक सेदान भारतात चार व्हेरीयंट मध्ये लाँच केली जात असल्याचे जाहीर केले होते. भारतात बेस मॉडेलची किंमत ३५ लाख रुपये असेल. अर्थात या कार्सचे उत्पादन अमेरिकेत होणार आहे असेही समजते.