अशी आहे कथा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे पुत्र सांब यांची


भगवान श्रीकृष्णांशी निगडित अनेक आख्यायिका आपल्या परिचयाच्या आहेत. यातील काही सर्वश्रुत आहेत, तर काही आपल्या तितक्याशा परिचयाच्या नाहीत. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे पुत्र सांब यांच्याबद्दलची आख्यायिकाही त्यांपैकीच एक आहे. या आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णांनी रागाच्या भरात आपलला पुत्र सांब याला शाप दिला आणि या शापाने सांबाला कुष्ठरोग झाला. हा शाप श्रीकृष्णाने का दिला, याची कारणे स्पष्ट करणारी कथा मोठी रोचक आहे. भगवान श्रीकृष्णाला पुष्कळ राण्या होत्या. यातीलच एक राणी जामवंताची कन्या जामवंती होती. पुराणांच्या अनुसार एक बहुमूल्य, दैवी मणी मिळविण्यासाठी श्रीकृष्ण आणि जामवंत यांच्यामध्ये युद्ध जुंपले. तब्बल अठ्ठावीस दिवस हे युद्ध चालले. तेव्हा श्रीकृष्णाचे खरे रूप जामवंताच्या समोर आल्याने जामवंताने श्रीकृष्णाचे पाय धरले आणि त्यांना हवा असलेला मणी आणि आपली कन्या जामवंती कृष्णाला दिली.

श्रीकृष्ण आणि जामवंती यांना जो पुत्र झाला, तोच पुत्र म्हणजे सांब. श्रीकृष्णाचा हा पुत्र इतका रुबाबदार आणि देखणा होता, की श्रीकृष्णाच्या अनेक राण्या देखील सांबाच्या रूपाला मोहल्या होत्या. एक दिवस सांबाच्या रूपाने मोहून जाऊन श्रीकृष्णाच्या एका राणीने सांबाच्या पत्नीचे रूप धारण केले आणि ती सांबाला आलिंगन देऊ लागली. श्रीकृष्णाने हे पाहिले, आणि त्यांना संताप अनावर झाला. सांब दिसावयास अतिशय देखणा असल्याने असे घडले असल्याचे श्रीकृष्णाला लक्षात आले. ज्याच्या रूपामुळे हे अनर्थ ओढवत आहेत, ते रूपच नष्ट करण्याच्या उद्देशाने श्रीकृष्णाने सांबाला शापाने कुष्ठरोगी बनविले.

या शापातून मुक्ती मिळविण्यासाठी महर्षी कटकांनी सांबाला सूर्योपासना करण्यास सांगितले. ऋषींच्या सल्ल्यानुसार सांबाने चंद्रभागा नदीच्या किनारी मित्रावनामध्ये सूर्यमंदिर बनवविले आणि बारा वर्षांपर्यंत सूर्योपासना केली. सांबाने बनविलेल्या सूर्यमंदिराला आदित्य मंदिर असेही म्हटले जात असे. सांबाच्या बारा वर्षांच्या तपस्येने प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी सांबाला चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यास सांगितले. या नदीमध्ये स्नान केल्याने आणि सूर्यदेवांच्या आशीर्वादाने सांब शापमुक्त होऊन त्याला त्याचे सुंदर शरीर परत मिळाले. म्हणूनच नंतरच्या काळामध्ये कुष्ठरोगी, किंवा एखाद्या असाध्य रोगाने ग्रस्त असलेले रोगी चंद्रभागेमध्ये स्नान करीत असत. हे स्नान केल्याने रोगातून मुक्ती मिळत असल्याची मान्यता प्राचीन काळामध्ये रूढ होती.

Leave a Comment