नांदेडच्या चौदा वर्षीय मुलीने अमेरिकेत उडविले विमान


नांदेड : आपल्या लाडक्या लेकीची नांदेडच्या कोंढा गावच्या शेतकऱ्याने पाठवणी हेलीकॉप्टरने केल्याची बातमी आपण सर्वांनी वाचली किंवा ऐकली असेल, आता त्याच गावातील कन्येने थेट आकाशालाच गवसणी घातली आहे. अमेरिकेत विमान उडवण्याचा पराक्रम अर्धापुर तालुक्यातील कोंढा येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने केला आहे. तिच्या या अभिमानास्पद कामगिरीने जोगदंड कुटूंबियासह संपूर्ण कोंढेकर ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

20 वर्षांपूर्वी कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. त्यांची मुलगी रेवा दिलीप जोगदंड यांच्या बालमनावर याचा परिणाम झाला. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरू केली आणि वयाच्या 14व्या वर्षी तिचे हे स्वप्न सत्यात उतरले.

रेवाच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला. या परिसरातील नागरिकांनी रेवाला भरभरून शुभेच्छा दिल्या.

अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही सुज्ञ कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याचबरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन प्रयोग केले जातात. तर येथील काही नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करून नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे.

राम कदम या प्रगतीशील शेतकऱ्याने मागील दोन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तिच्या लग्न समारंभात हेलीकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. या शाही विवाह सोहळ्याची प्रसार माध्यमांतून मोठी प्रसिद्धी झाली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते.

तर आता दिलीप जोगदंड यांची कन्या रेवा दिलीप जोगदंड हिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत पायलट पदासाठी लागणाऱ्या संपूर्ण चाचण्या पार करून 20 जून 2021 रोजी विमानाची यशस्वी भरारी घेऊन आकाशाला गवसणी घातली. या अभिमानास्पद कामगिरीसाठी तिचे वडील दिलीप जोगदंड, आई वंदना दिलिप जोगदंड यांनी तिला सतत प्रोत्साहन दिले आहे. या यशाबद्दल तिचे अर्धापूर तालुक्यातील सुज्ञ नागरिक, कोंढा येथील गावकरी व जोगदंड परिवाराकडून कौतुक केले जात आहे.